घातक रसायनांच्या भीतीमुळे मागणीत घट; डझनाला २०० रुपयांचा दर

नवी मुंबई फळे पिकविण्यासाठी फवारण्यात येणाऱ्या इथिलिनमध्ये ३९ टक्के घातक इथेफॉन रसायन आढळल्याने केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा प्राधिकरणाने इथिलिनवर बंदी घातली आहे. हे रसायन आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असल्याने हापूस आंब्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. घाऊक फळ बाजारात आवक वाढली असताना ग्राहक नसल्याने हापसू आंब्याचे गगनाला भिडलेले भाव जमिनीवर आले आहेत. ५०० ते १५०० रुपये डझन किमतीने विकला जाणारा आंबा २०० ते ६०० रुपये डझनवर आला आहे.

यंदा हंगाम सुरू झाल्यापासून आंब्याचे भाव ५०० रुपये प्रति डझनपेक्षा कमी झाले नव्हते. ते ३०० ते ४०० रुपयांनी घटून २०० रुपये डझनपर्यंत गडगडले आहेत. उत्तम गुणवत्ता व आकाराचे आंबे ६०० रुपये प्रति डझन दराने उपलब्ध आहेत. हापूस आंबा बाजारात सध्या अन्न व औषध विभाग छापे घालत आहे. ही पथके इथिलिनचा वापर केल्याचा संशय आल्यास संबंधित व्यापाऱ्यांकडचे आंबे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात. तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने कॅल्शियम कार्बाईडवर बंदी घातली आहे. त्यामुळे घाऊक बाजारातून कॅल्शियम कार्बाईडच्या पुडय़ा टाकून हापूस आंबा पिकविण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे. त्याला पर्याय म्हणून इथिलिन गॅस फवारण्यास अन्न व औषध विभागाने परवानगी दिली होती.

केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा आणि मानांकन प्राधिकरणाच्या संचालिका गरीमा सिंग यांनी १३ मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात इथिलिनच्या फवारणीत इथेफॉन हे घातक रसायन ३९ टक्क्यापर्यंत आढळल्याने इथिलिन फवारणी करू नये असे स्पष्ट नमूद केले आहे. केंद्र सरकारच्या या आदेशाची अंमलबजावणी सर्व राज्यांतील अन्न व औषध प्रशासन करीत आहेत.

राज्यातील अन्न व औषध विभागाने सध्या वाशी येथील फळांच्या घाऊक बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले असून ४० पेक्षा जास्त व्यापाऱ्यांकडील हापूस आंबा जप्त करण्यात आला आहे. या बाजारातील बडय़ा व्यापाऱ्यांनी आपली स्वत:ची आंबा पिकवण्याची केंद्रे स्थापन केली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील हापूस आंबा खाल्ल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे अन्न व औषध विभागाने जाहीर केले आहे.

इथिलिन फवारणीच्या भीतीने गेल्या चार दिवसांपासून आंबा बाजारात मंदी आली आहे. याच काळात चार दिवस लागोपाठ शासकीय सुटय़ा लागल्याने अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत, तर काही जणांनी देशी परदेशी सहलीचे आयोजन केले आहे. मे महिन्यातील लग्नसराईचा परिणामही या खरेदीवर झाला आहे. बाजारात हापूस आंब्याच्या अनेक पेटय़ा ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. याचा फायदा ग्राहकांना होत आहे. अक्षय्य तृतीयेपर्यंत गतवर्षीच्या निम्मी आवक असल्याने हापूस आंब्याचे भाव पाचशे रुपये प्रति डझनापेक्षा जास्त होते. बाजारातील मंदीमुळे इथिलिन फवारणीमुक्त असलेला हापूस आंबादेखील सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रसायनांचा वापर करून पिकवलेल्या फळांमुळे आतडे आणि मूत्रपिंडावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. फळांमधील जीवनसत्त्वे या रासायनिक घटकांमुळे नष्ट होतात.

फळे पिकविण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने लहान मुलांसाठी अतिशय घातक आहेत. या रासायनांमुळे अ‍ॅसिटिलीन नावाचा वायू तयार होतो. त्याचा परिणाम मेंदूवर होतो. याव्यतिरिक्त ताप येणे, मळमळ होणे, उलटय़ा, जुलाब इत्यादी त्रासही संभवतात.

– डॉ. सुदर्शन सोनवणे, आहारतज्ज्ञ

कोकणातील आंबा नैसर्गिकरीत्या पिकविण्यासाठी आठ दिवस लागतात. रसायनांच्या मदतीने पिकवलेल्या आंब्याचा केवळ रंग बदलतो. नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्याप्रमाणे चव मात्र त्याला नसते. अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करणे आवश्यक आहे.

– सोनाली सावंत, ग्राहक

नैसर्गिकरीत्या पिकवण्याच्या पद्धती

कोकणात आंब्यासाठी रासायनिक खतांचा वापर फारसा केला जात नाही. आंबे झाडावरून काढल्यानंतर भाताच्या गवताची अढी घालून त्यात ठेवले जातात. भाताच्या गवतात उष्णता असते. त्याच्या थरांत आंबे ठेवल्यामुळे ते आठ दिवसांत खाण्यासाठी तयार होतात.

नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा असा ओळखा..

* नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या आंब्यांचा रंग गुलाबी, पिवळा असतो. कार्बाइड अथवा अन्य रसायनांमध्ये पिकविलेल्या आंब्यांचा रंग हा अतिशय गडद व पिवळाधमक असतो.

* नैसर्गिकरीत्या पिकविलेले आंबे पिवळे असतात आणि देठ मात्र हिरवा असतो. कार्बाइडने पिकविलेल्या आंब्याचा देठही पिवळा असतो. रत्नागिरी हापूसची कोय लहान असते.

* एका पेटीतील अथवा एका ठिकाणी ठेवलेले सर्व आंबे जर एकसारख्या आकाराचे आणि पिवळेधमक दिसत असतील, तर ते रसायनांच्या साहाय्याने पिकविले असण्याची शक्यता अधिक असते.

* कार्बाइडविरहित आंब्याला विशिष्ट सुवास असतो. मोठय़ा संख्येने आंबे असल्यास हा सुवास परिसरात दरवळतो. मात्र, कार्बाइडने पिकविलेल्या आंब्याला सुवास नसतो. या आंब्यांना गोडीही नसते.

चार दिवसांपासून हापूस आंबा बाजारात मंदी आली आहे. अन्न व औषध विभागाने धाडसत्र सुरूकेल्याने व्यापारी भयभीत झाले आहेत. इथिलिनला पर्याय दिल्याशिवाय ही बंदी घालण्यात आली आहे. याच विभागाने तीन वर्षांपूर्वी हा पर्याय दिला होता. नैसर्गिकरीत्या आंबा पिकवण्यात वेळ जात असल्याने आरोग्यास हानिकारक नसलेली रसायने वापरण्यास सरकारने परवानगी द्यायला हवी. मंदीचा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे.

– बाळासाहेब बेंडे, माजी संचालक, एपीएमसी, तुर्भे