News Flash

‘लाखमोलाची हापूस पेटी’ घाऊक व्यापाऱ्यांच्या जिव्हारी

कोकणातील दहा हापूस आंबा बागायतदारांच्या पाच डझनाच्या दहा पेटय़ांचा लिलाव नुकताच मुंबईतील मॅरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला.

हापूस आंबा

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : कोकणातील दहा हापूस आंबा बागायतदारांच्या पाच डझनाच्या दहा पेटय़ांचा लिलाव नुकताच मुंबईतील मॅरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. पहिल्यांदाच पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या या लिलावात राजापूर येथील हापूस आंबा बागायतदार बाबू अवसरे यांच्या पाच डझनाच्या पेटीला उद्योजक राजेश अथायडे यांनी एक लाख आठ हजार रुपयांचा भाव देऊन सर्वानाच आश्र्चयाचा धक्का दिला आहे. या लाखमोलाच्या लिलावामुळे ‘एमएमआरडीए’ला हापूस आंबा पुरवठा करणाऱ्या नवी मुंबईतील घाऊक फळ बाजारातील व्यापारी मात्र हवालदिल झाले आहेत.

कोकणातील हापूस आंब्याला अशा प्रकारे लाखाचा भाव मिळत असेल तर थेट पणनासाठी कोकणातील हापूस आंबा बागायतदारांची मोठी स्पर्धा होण्याची भीती या व्यापाऱ्यांना लागून राहिलेली आहे.

कोकणातील हापूस आंब्याची तुरळक आवक सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यात मुंबई पुण्यात देवगडची मुहूर्ताची पेटी आली होती. त्यानंतर कोकणातून काही शेकडोच्या पेटय़ा तुर्भे येथील एपीएमसीच्या घाऊक बाजारात येऊ लागलेल्या आहेत. गेल्या वर्षी करोना साथ रोगामुळे फळ बाजार पहिले काही महिने बंद होते. ऐन हापूस आंब्याच्या मोसमात सुरू झालेला हा प्रादुर्भाव कोकणातील हापूस आंबा बागायतदारांच्या जीवावर उठणारा होता. त्या वेळी कोकण भूमी प्रतिष्ठान या कोकणातील मातृसंस्थेने राज्याच्या पणन विभागाच्या साह्य़ाने थेट पणनद्वारे राज्याच्या कानाकोपऱ्यात हापूस आंब्याची विक्री केली. त्यामुळे कोकणातील तरुणांना रोजगार आणि आंबा बागायतदारांना चांगला मोबदला मिळाला. गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या या व्यापाऱ्याला कोकण भूमी प्रतिष्ठानच्या ग्लोबल कोकण या ब्रॅन्डने यंदा व्यावसायिक पद्धतीेने हापूस आंब्याची विक्री सुरु केली आहे. एक मार्च रोजी देशाचे माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत कोकणातील उत्तम हापूस आंब्याची डिजिटल विक्री सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर मुंबईतील मॅरिएट या पंचतारांकित अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हापूस आंब्याचा पहिल्यांदाच जाहीर लिलाव घेण्यात आला. यात कोकणाच्या सर्वात्तम हापूस आंबा उत्पादित होणाऱ्या गावातील दहा हापूस आंबा बागायतदारांच्या दहा पेटय़ा लिलावात मांडण्यात आल्या. त्यातील राजापूरच्या शेतक ऱ्याच्या पाच डझनाच्या पेटील एक लाख आठ हजारांची बोली उद्योजक अथायडे यांनी लावली. त्यामुळे  एका हापूस आंब्याचा दर १६ हजार आठशे पर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. फळांचा राजा हापूस आंब्याला इतिहासात मिळालेल्या या पहिल्याच दराने मुंबई, नवी मुंबईतील व्यापारी हवालदिल झाले आहेत.

कोकणातील हापूस आंब्याला इतका चांगला दर मिळत असेल तर गेली अनेक वर्षे बागायतदारांना मुंबईतील हे व्यापारी जेवढा दर देतील तेवढा स्वीकारत होते असे सिद्ध झाले आहे. ग्राहक आणि बागायतदार यांच्या मध्ये असलेले ही व्यापारी दलाल मात्र याच आंब्याच्या जोरावर लाखो रुपयांची कमाई करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. कोकणातील हापूस आंब्याला इतका दर मिळत असेल तर तो व्यापाऱ्यांच्या ताब्यात न देता त्याची थेट विक्री करणे योग्य आहे असे मत कोकणातील हापूस आंबा बागायतदारांचे झाले आहे.

कोकणाच्या या लाखमोलाच्या भावामुळे गेली अनेक वर्षे हापूस आंब्यावर व्यापाऱ्याचे गणित असलेले व्यापारी मात्र चिंताग्रस्त झाले आहेत. अशा प्रसिध्दीमुळे यंदा कोकणातील हापूस आंब्याची घाऊक बाजारात येणारी आवकही कमी होण्याची शक्यता असून बागायतदार जास्तीत जास्त थेट विक्रीचा प्रयत्न करणार आहेत.

कोकणातील हापूस आंब्याची थेट विक्री करणे योग्य आहे. करोनामुळे ही बाब अधोरेखित झाली इतकाच यात फरक आहे. कोकणातील प्रत्येक बागायतदाराने यथावकाश हापूस आंबा शेतकरी बाजारात जाऊन विकल्यास त्याला जादा पैसे मिळण्याची शक्यता अधिक आहे. हा प्रयोग मी स्वत: केला आहे. त्यामुळे ग्राहकांनाही चांगला व स्वस्त हापूस आंबा मिळणार आहे.

– अभिजीत पेडणेकर, हापूस आंबा उत्पादक, रत्नागिरी

कोकणातील हापूस आंब्याला लाखाचा भाव मिळू शकतो हे सिद्ध झाले आहे. जगात तीन लाख रुपयांचादेखील हापूस आंब्याला भाव मिळालेला आहे. जांभा दगडावरील हापूस आंबा हा जगात सर्वात्तम आहे. त्याला लाख रुपये मोल मिळाल्याचा आनंद आहे. यानंतर कोकणातील प्रत्येक बागायतदारांनी थेट विक्री करावी. घाऊक व्यापाऱ्यांनी इतकी वर्षे कमविले आहे आता बागायतदारांसाठी चांगले दिवस आले आहेत.

– संजय यादवराव, अध्यक्ष , कोकण भूमी प्रतिष्ठान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2021 1:19 am

Web Title: alphonso mango hapus mango box one lakh rupees price dd 70
Next Stories
1 अठरा केंद्रांवर लसीकरण
2 आठवडय़ाची मुलाखत : दररोज चार हजार जणांच्या लसीकरणाचे लक्ष्य
3 शहरबात : दर्जा घसरला
Just Now!
X