|| विकास महाडिक

मुंबईच्या बाजारात  प्रति डझन दोन हजारांपर्यंत विकला जाण्याची शक्यता

कोकणातील हापूस आंब्याने मुंबईतील घाऊक बाजारपेठांवर अधिराज्य आणि दक्षिण भारतातील हापूस आंब्याने मुंबईत मुसंडी मारल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा बुधवारी तुर्भे येथील फळ बाजारात डेरेदाखल होत आहे. भारतातील आंबा खवय्यांची चव भागविण्यासाठी पहिल्यांदाच परदेशातून हापूस आंबा मुंबईत येत आहे. विशेष म्हणजे रत्नागिरीतून कलम करून नेण्यात आलेला हा हापूस आंबा चवीला व आकाराला कोकणातील हापूस आंब्यासारखाच असून फळांचा राजा बाजारात येण्यापूर्वी तीन महिने विक्रीला येत आहे. त्यामुळे तो कोकणातील हापूस आंब्याला टक्कर वगैरे देण्याचा प्रश्न येत नाही. दक्षिण आफ्रिकेतील वाहतूक आणि मशागत पाहता हा हापूस आंबा मुंबईच्या बाजारात दोन हजार रुपयापर्यंत प्रति डझन विकला जाण्याची शक्यता आहे.

कोकणातील हापूस आंब्याची संपूर्ण जगाला भुरळ आहे. आखातील देशातील अरब तर या हापूस आंब्याचे खरे दर्दी आहेत. त्यामुळेच कोकणातील हापूस आंब्याची खरी बाजारपेठ ही आखाती देश आहेत. याच कोकणातील हापूस आंब्याची रोपे व कलम नेऊन अनेकांनी आपल्या गावात बागा फुलवल्या आहेत. यात कर्नाटक आघाडीवर असून सध्या कर्नाटकमधील हापूस आंबा कोकणातील हापूस आंब्याला डोकेदुखी ठरला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतांच्या बांधावर कोकणातील हापूस आंब्याची लागवड केली आहे.

देशातील अनेक भागात कोकणातील विशेषत:

देवगडमधील हापूस आंब्याची लागवड होत असताना दक्षिण आफ्रिकेतील शेतकऱ्यांनीही कोकणातील हापूस आंब्याचा प्रयोग करण्याचा निश्चय करून जून २०११ पासून कलम हापूस आंब्याची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या लीलॉण्डवेमधील मलावी प्रदेशात ही हापूस आंब्याची लागवड मलावी मॅन्गोज ऑपरेशन लिमिटेड या कंपनीने केली आहे. त्यासाठी ६०० एकर जमीन भाडेपट्टय़ावर घेण्यात आलेली आहे. तेथील वातावरण हे रत्नागिरीच सारखे आहे. त्यामुळे मागील आठ वर्षांत येथील ६० हजार रोपांना चांगलाच भर आला आहे. यातील १५ हजार आंब्यावरील आंबे पिकण्यायोग्य झाल्याने मंगळवारी २१०डझन हापूस आंब्याच्या पेटय़ा तुर्भे येथील घाऊक फळ बाजारात विक्रीसाठी पाठविल्या जाणार आहेत.

हवाई वाहतूक खर्च आणि तेथील मशागत पाहता मुंबईतील बाजारात हा हापूस आंबा १८०० ते २००० रुपये प्रति डझन विकला जाण्याची शक्यता आंबा व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले. पानसरे यांना हा मलावी दक्षिण आफ्रिकन हापूस आंबा विकण्याचा पहिला मान मिळालेला आहे.

चव कोकणातील हापूससारखीच?

दक्षिण आफ्रिकेतील लीलॉण्डवे भागात ही हापूस आंब्याची बाग गेली आठ वर्षे तयार केली जात असून तिच्या निगराणीसाठी ३०० मजूर दिवसरात्र झटत आहेत. इंग्लंडमधील काही अनिवासी भारतीयांनी हा प्रयोग करण्यासाठी गुंतवणूक केली असून हापूस आंब्याची जगातील मागणी लक्षात घेऊन त्याची शेती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या हापूस आंब्याची पॅकेजिंग आकर्षक आहे. ३०० ग्रॅम वजनाचा हा हापूस आंब्याची साल व चव कोकणातील हापूस आंब्यासारखीच असल्याचा दावा केला जात आहे.

कोकणातील हापूस आंब्याच्या कांडय़ा घेऊन जाऊन दक्षिण आफ्रिकेत कलम करण्यात आलेल्या आहेत. नैसर्गिक पाश्र्वभूमी कोकणासारखीच असल्याने हा हापूस आंबा कोकणासारखाच आहे. केवळ मुंबईत ह्य़ा आंब्याची विक्री न करता युरोप, आखाती देश, आफ्रिकन देशात केली जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.      – निरंजन शर्मा, सल्लागार, मलावी मॅन्गोज ऑपरेशन लिमिटेड. दक्षिण आफ्रिका