दर्जात्मक व मुबलक हापूस उपलब्ध नसल्याने हंगामावर परिणाम

नवी मुंबई फळांचा राजा हापूस यंदा नैसर्गिक संकटात सापडला आहे. वाशीतील एपीएमसी बाजारात एप्रिल, मे महिन्यात सुरू होणाऱ्या हापूसची आवक निम्म्यावर आली असून सुरुवातीच्या काळातील बोचरी थंडी व आता उन्हाचा चटका यामुळे मालाचा दर्जाही घसरला आहे. त्यामुळे हापूसच्या आखाती देशातील निर्यातीवर परिणाम होत असून हंगाम लांबला असल्याची माहिती निर्यातदारांनी दिली.

आखाती देशात, लंडन, ऑस्ट्रेलिया, कुवेत या ठिकणी देवगड, रत्नागिरी, अलिबाग येथील हापूस आंब्यांना जास्त प्रमाणात मागणी असते. एपीएमसी बाजारात एप्रिलपासून आंबा आवकीला मोठय़ा प्रमाणात सुरुवात होत असते. परंतु यंदा हवामान बदल, थंडी लांबल्याने तसेच कडक उन्हामुळे हापूस उत्पादनावर परिणाम झाला असून ४० टक्केच उत्पादन आहे. एपीएमसी बाजारात दर वर्षी होणारी आवक आता निम्म्यावर आली आहे. तसेच ‘थ्रीप्स’ रोगाच्या प्रादुर्भावामुळे आंब्याच्या दर्जावरही परिणाम झालेला आहे. आखाती देशात हापूस निर्यात करण्यासाठी निर्यातदारांना नियमांच्या चौकटीतून आंबानिर्यात करावी लागते. आंब्याचा आकार, वजन आणि दर्जा महत्त्वाचा असतो. मात्र आताचा हापूस खार पडल्याने काळवंडलेला तर आकाराने अगदी लहान असा येत आहे.  हापूसच्या एकूण उत्पादनापैकी ६० टक्के हापूस एपीएमसीमध्ये तर ४० टक्के निर्यात होत असतो. १५ एप्रिलपासून हापूसच्या निर्यातीला वेग येतो, मात्र पुरेशा प्रमाणात व दर्जात्मक हापूस उपलब्ध नसल्याने केवळ ५ टक्के हापूसनिर्यात सुरू झाली आहे. एप्रिल ते मे अखेपर्यंत निर्यातीवर जोर असतो.

परदेशातही दरात घसरण

परदेशातदेखील हापूसच्या दरात घसरण पाहावयास मिळत आहे. ग्रॅमनुसार हापूसला बाजारभाव उपलब्ध होतो. एक आंबा वजनाने २०० ग्रॅमला प्रतिडझन ६७५ रु., २४० ग्रॅमला ९५० रु., तर २७० ग्रॅमला १४०० रु. बाजारभाव आहे.

यंदा बाजारात कमी हापूस दाखल होत आहे. तसेच विविध कारणांनी उत्पादन तर घटले आहेच, परंतु दर्जादेखील खालावला आहे. त्यामुळे निर्यात करताना अडचणी निर्माण होत आहेत.

– मोहन डोंगरे, आंबा निर्यातदार