हंगाम लवकर सुरू झाल्याने भाव निम्म्यावर; आवक वाढली..

पूनम धनावडे, नवी मुंबई</strong>

कोकणातल्या आमराईत तयार झालेला अवीट गोडीचा फळांचा राजा यंदा मुंबईत लवकर दाखल झाल्याने त्याचा भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मा आहे. हंगाम लवकर सुरू झाल्याने हापूसचे दर घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न समितीच्या (एपीएमसी) फळ बाजारात गेल्यावर्षी फेब्रुवारीत ४ ते ६ डझनच्या हापूसच्या पेटीचा भाव तीन ते सात हजार होता, तर यंदा तो दीड हजार ते चार हजार रुपये आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

देवगड हापूसच्या ६०० पेटय़ा जानेवारीतच दाखल झाल्या होत्या. त्यावेळी गेल्या ५० वर्षांत हंगाम सुरू होण्याआधीच मोठय़ा प्रमाणात आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले होते. सोमवारी फळ बाजारात हापूसच्या एक हजार ४५० पेटय़ा दाखल झाल्या. गेल्यावर्षी याच महिन्यात ५०० ते ६०० पेटय़ा आल्या होत्या. हंगाम लवकर सुरू होऊन मोठी आवक झाल्याने भाव घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ‘एपीएमसी’मध्ये रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्य़ातून हापूसची आवक होते. सध्या बाजारात येणाऱ्या पेटय़ांमध्ये ७० टक्के पेटय़ा सिंधुदुर्गातील आहेत. हापूसचे हे फळ लहान असून परिपक्व  नसल्याचे व्यापाऱ्यांचे मत

आहे.  यंदा कडाक्याची थंडी पडल्याने त्याचा परिणाम आंब्याच्या उत्पादनावर झाला आहे. आंब्यासाठी उष्ण-दमट हवामान उपयुक्त असते. परंतु यंदा कडाक्याच्या थंडीचा मुक्काम वाढल्याने फळांची वाढ खुंटली आहे. बाजारात येणाऱ्या आंब्यापैकी ४० टक्के फळे आकाराने लहान आहेत, असे फळ व्यापारी संजय पिंपळे यांनी सांगितले.

आवक का वाढली?

रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागात हापूस लागवडीचे क्षेत्र वाढत असल्याने उत्पादनही वाढत आहे. कल्टार फवारणी केलेला हापूसही बाजारात दाखल होत असल्याने आवक वाढली आहे. बागायतदार आंब्याला लवकर मोहोर यावा म्हणून जून-ऑगस्टमध्ये

झाडांच्या मुळाशी ‘कल्टार’

या रसायनाची फवारणी करतात. त्यामुळे लवकर मोहोर येतो. मात्र रसायनाच्या फवारणीमुळे झाडांचे नुकसान होते. पाने लवकर पिवळी होऊन गळून पडतात.

काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत असल्याने फेब्रुवारीत येणारा हापूसचा मोहर धोक्यात आला असून उत्पादन घटण्याची शक्यता आहे. 

 – चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक महासंघ