|| सुहास जोशी

सहापदरी उन्नत तसेच भुयारी रस्त्याची योजना; सुसाध्यता अहवालास अनुकूलता

मुंबई-पनवेल रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लवकरच तुर्भे ते खारघर असा सहापदरी उन्नत आणि भुयारी पर्यायी मार्ग होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नुकताच यासंदर्भातला पूर्व सुसाध्यता अहवाल (प्री फिजिबिलिटी रिपोर्ट) तयार केला असून त्यानुसार हा पर्यायी मार्ग बांधण्यासाठी सकारात्मकता दर्शविण्यात आली आहे.

मुंबईतून बाहेर पडताना, येताना दोन्ही वेळी बेलापूर, नेरुळ या ठिकाणी वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. ही कोंडी टाळण्यासाठी दोन्ही दिशांना कोणताही पर्याय नव्हता. त्यावर उपाय म्हणून तुर्भे ते खारघर असा पर्यायी मार्ग बांधण्यात येणार आहे. तुर्भे औद्योगिक क्षेत्रापासून जुईनगर येथून या पर्यायी मार्गाची सुरुवात होणार असून तो खारघर येथील गुरुद्वारापर्यंत असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुर्भे आणि खारघर या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन किमीचा उन्नत मार्ग आणि मधल्या टप्प्यात २ किमीचा भुयारी मार्ग अशी या पर्यायी मार्गाची रचना असणार आहे. मधल्या टप्प्यातील दोन किमीचा भुयारी मार्ग हा पारसिक डोंगराच्या पोटातून काढण्यात येणार आहे. एकूण सहा किमीच्या या मार्गासाठी सुमारे १५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या मार्गावर टोल आकारला जाईल. या मार्गामुळे मुंबई-पुणे प्रवासातील वेळ आणखी कमी होणार असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाकडून या ठिकाणी पर्यायी मार्ग तयार करता येईल का, याबाबत विचारणा झाल्यानुसार महामंडळाने पूर्व सुसाध्यता अहवाल तयार केला आहे. पूर्व सुसाध्यता अहवालामध्ये मार्गाची गरज, मार्ग बांधण्यासाठी सुयोग्य जागा आणि या मार्गावरून जाण्यासाठी वाहनचालकांची इच्छा या बाबींचा अभ्यास केला जातो. पूर्व सुसाध्यता अहवालावर महामंडळाची मंजुरी मिळाल्यावर अहवाल शासनाच्या पायाभूत सुविधा समितीकडे पाठवला जातो. त्यानंतर सविस्तर अहवाल, मंत्रिमंडळ परवानगी वगैरे प्रक्रिया केल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आठवडाभरात चर्चा

सर्व प्रक्रिया वेळेत पार पडल्या तर दोन वर्षांत हा मार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे, मात्र मधल्या काळात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पूर्व सुसाध्यता अहवालावर आठवडय़ाभरात महामंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन तो स्वीकारायचा की नाही हे ठरविण्यात येईल.