श्वसनविकारांच्या धोक्यात वाढ

ओखी चक्रीवादळाचा परिणाम म्हणून नवी मुंबईत पाऊस पडल्यापासून शहरातील धुरक्याचे प्रमाण वाढले आहे. नवी मुंबईतील प्रदूषणाने नवी दिल्लीतील प्रदूषणालाही मागे टाकले असताना येथील रहिवासी श्वसनाच्या आजारांनी बेजार झाले आहेत. खोकला, श्वास घेण्यास त्रास, छतीचे आजार यांचे प्रमाण वाढले आहे.

हिवाळ्यामुळे निर्माण झालेले धुके, हवेतील वाढलेली आद्र्रता आणि कारखान्यांतून निघणारा धूर यामुळे नवी मुंबईत सर्वत्र धुरके निर्माण होत आहे. धूळही मोठय़ा प्रमाणात उडत आहे. त्यामुळे खोकला आणि घशाच्या संसर्गात वाढ झाल्याचे श्वसनविकारतज्ज्ञांनी स्पष्ट केले. औद्योगिक वसाहत, वाढती वाहने, वाहतूककोंडी यामुळे जल-वायू-ध्वनिप्रदूषणात वाढ झाली आहे. त्याचा नवी मुंबईकरांच्या आरोग्यावर जीवघेणा परिणाम होत आहे. खारघरजवळच तळोजा औद्योगिक वसाहत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचेही काम सुरू आहे. त्यामुळे नवी मुंबईत प्रदूषणाची समस्या तीव्र आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

डॉ. आरती मिश्रा म्हणाल्या की, पावसानंतर श्वसांनाचे आजार वाढले आहेत. खोकला वाढल्यास, दम लागत असल्यास वाफारा घ्यावा.