X

आंबेडकर स्मारक यंदाही अपूर्णच

ऐरोलीतील स्मारकाच्या कामाला ६ एप्रिल २०११ मध्ये सुरुवात करण्यात आली.

शेखर हंप्रस

डिसेंबरचा मुहूर्त टळणार; दुसऱ्या टप्प्याचे काम संथ गतीने

ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम सात वर्षे झाली तरी पूर्णत्वास आले नाही. दुसऱ्या टप्प्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने डिसेंबरचा मुहूर्तही गाठणे अशक्य आहे. इमारत तयार झाली असून डोमला मार्बल लावणे, मार्बल आच्छादन, अंतर्गत सजावट  बाकी असून वर्षांचा कालावधी लागणार आहे. प्रकल्प रेंगाळल्याचे खापर तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर फोडण्यात येत आहे.

ऐरोलीतील स्मारकाच्या कामाला ६ एप्रिल २०११ मध्ये सुरुवात करण्यात आली. ५ एप्रिल २०१३ पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ही मुदत वारंवार वाढवत नेऊन अखेरीस २०१४ मध्ये पहिल्या टप्प्याचे लोकार्पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये संपूर्ण स्मारकाचे लोकार्पण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र मूळ आराखडय़ात बदल केले. त्यात वेळ गेला.

४९ मीटर उंचीचा डोम हा स्मारकाचा सर्वात आकर्षक भाग आहे. त्याला मार्बल लावण्यात तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तांत्रिक कारणांनी नकार दिला होता. त्यामुळे स्मारक समितीने जोरदार विरोध करून पालिकेवर मोर्चाही काढला होता. विद्यमान आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी मात्र डोमसाठी परवानगी दिल्यावर या वादावर पडदा पडला आहे.  या महिन्यात स्मारकाचा लोकार्पण सोहळा होण्याची आशा मावळली आहे. दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी १० कोटी ३५ लाख रुपयांना मंजुरी घेण्यात आली आहे. अंतर्गत सजावट, फॉल सीलिंग, रंगकाम, रेलिंग, प्लम्बिंग, अग्निशमक यंत्रणा बसविणे, वातानुकूलित यंत्रणा आणि व्हिडीओ व्हच्र्युअलचा समावेश आहे.

कामाबाबत नाराजी

* रिपाइं नेते सिद्राम ओहोळ यांनी स्मारकाचे काम धिम्या गतीने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या स्मारकातील फरशा उखडल्या असल्याची खंत व्यक्त केली आहे.

* माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धोरणाने कामास उशीर झाला. मात्र आता काम प्रगतिपथावर असल्याची माहिती दिली.

असे स्मारक

*  डोमची उंची ४९.२० मीटर.

* ३२५ चौ.मी.चे प्रार्थना स्थळ.

* १३४ चौ.मीचे कलादालन.

*  दर्शनी ११४ चौरस मीटरचे वाचनालय, अभ्यासिका.

*  ३०० आसन क्षमता असणारा बहुउद्देशीय कक्ष.

*  ३७ चौरस मीटरचे संमेलन कक्ष, १७४ चौरस मीटरचे सेवा क्षेत्र.

*  ३०० ते ४०० आसन क्षमतेचे जापनीज पोडियम उद्यान.

*  स्मारकाच्या मागील बाजूस फुलांनी सजवलेला रंगमंच. ४०० आसन क्षमतेची हिरवळ.

*  अर्धगोलाकार प्रवेशद्वार. पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी अर्धगोलाकार जिना. रात्रीच्या वेळी आकर्षक रंगेबेरंगी रोषणाई.

*  एकूण खर्च

२५ कोटी ८२ लाख.

काम वेगाने सुरू असून अंतर्गत आणि परिसर सजावट तसेच डोमचे काम बाकी आहे. निधीची कमतरता नसून सहा महिन्यांपर्यंत काम होईल.

– गिरीश गुमास्ता (कार्यकारी अभियंता)