नवी मुंबई : लोणावळा, खोपोलीतील पाणथळ जागी काही काळ विसवलेले अमूर ससाणाच्या छायाचित्रीकरणावर टाटा व वन विभागाने बंदी घातली आहे. मंगोलिया येथून दक्षिण अफ्रिकेपर्यंत निघालेला हा छोटासा पक्षी वीस हजार किलोमीटरचे अंतर तीन ते चार महिने पार करून तो मायदेशी जात असतो. अलीकडे त्याचे काही काळ खोपोली येथील टाटा पॉवर हाऊस परिसरात तसेच लोणावळ्याच्या डोंगराळ भागात दुर्मीळ दर्शन आढळून आल्याने पक्षीप्रेमी व छायाचित्रकारांची एकच गर्दी या भागात उसळली होती. टाटा पॉवरने सुरक्षिततेच्या दृष्टीने तर पुणे वन विभागाने या पक्ष्याच्या संवर्धनासाठी पक्षीप्रेमींना या परिसरात बंदी घातल्याने पक्षीप्रेमींचा हिरमोड झाला आहे.

जगात सर्वाधिक लांबचा प्रवास करणारा शिकारी जातीतील अमूर ससाणा (फाल्कन) गेली तीन वर्षे कोल्हापूरच्या माळरानांवर आढळून आलेला आहे. हा पक्षी टाटा पॉवरच्या खोपोली येथील विद्युत केंद्राजवळील भागात फिरत असल्याची कुणकुण पक्षीप्रेमींना लागल्यानंतर या ठिकाणी त्याची छबी टिपण्यासाठी पक्षी व छायाचित्रकारांची एकच झुंबड उडाली. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव टाटाने दहा दिवसांतच येथील पक्षीप्रेमींना मज्जाव केला तर लोणावळ्यातील डकलेन परिसरात या पक्ष्याचे वास्तव आढळून आल्याने वन विभागाने या पक्ष्याच्या संवर्धन व सुरक्षिततेच्या दृष्टीने वन विभागात छायाचित्रीकरणाला बंदी घातली आहे. मंगोलियामधून निघालेले हे पक्षी नागालॅण्डमध्ये जास्त वास्तव्य करतात. त्या ठिकाणी त्यांच्या संवर्धनासाठी केंद्रीय वनविभागाने विशेष प्रयत्न केले आहेत. तपकिरी रंगाच्या या पक्ष्याच्या आगमनाबरोबरच आता उरण, नवी मुंबई येथील पाणथळीच्या जागी रोहित (प्लेमिंगो ) पक्ष्याचे थवे दिसू लागले आहेत.