खाडीतील भराव, खारफुटीची कत्तल आणि वाढत्या प्रदूषणामुळे टंचाई; दर दुप्पट

उरण : वर्षभर अन्य माशांच्या तुलनेत स्वस्त असणाऱ्या आणि खोल समुद्रात मासेमारीबंदी लागू झाल्यानंतरही मत्स्याहारींची जिव्हा तृप्त करणाऱ्या बोंबील आणि मांदेलीसारख्या परवडणाऱ्या मासळीच्या किमतीही सध्या कडाडल्या आहेत. एरवी ३० रुपयांना मिळणारे बोंबील आता १०० रुपयांवर पोहोचले आहेत, तर मांदेलीने २५ रुपयांवरून ९० रुपयांपर्यंत मजल मारली आहे.

खोल समुद्रातील मासेमारीवर पावसाळ्यात जून आणि जुलै अशी दोन महिन्यांची बंदी आहे. त्यामुळे या काळात मासळीची आवक घटते. बाजारात ताजे मासे उपलब्धच नसल्यामुळे मत्स्यप्रेमी सुक्या मसळीवर समाधान

मानतात. समुद्रातील प्रदूषण, खारफुटींची कत्तल, भराव, यांत्रिक मासेमारी यामुळे मुळातच ताजे मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे आणि त्यांच्या किमती वाढल्या आहेत. सुक्या मासळीचेही दरही प्रचंड वाढले आहेत. समान्यपणे समुद्र किंवा खाडीलगतच्या खारफुटी हे माशांचे प्रजननस्थळ असते. मात्र विकासाच्या रेटय़ात ही ठिकाणेच नाहीशी होत आहेत. त्याचा परिणाम मासळीच्या उपलब्धतेवर आणि किमतींवर होत आहे.

माशांची दरवाढ (रुपयांत)

मासे    पूर्वीचा  सध्याचा

दर     दर

बोंबील     ३०     १००

मांदेली    २५     ८०

निवटय़ा १२०    २५०

खेकडे     ८०     २००