हलगर्जी करणाऱ्या पुरवठादारावर कारवाईची मागणी

पनवेल : येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राणवायूची गळती कर्मचाऱ्यांच्या वेळीच लक्षात आल्यामुळे दुर्घटना टळली असली तरी महिनाभरापूर्वी बसविलेल्या यंत्रणेत हा बिघाड कसा झाला, असा प्रश्न आता उपस्थित होत असून या प्रकरणात पुरवठादाराचा हलगर्जीपणा दिसत असल्याने त्याच्यावर कारवाईची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.

या रुग्णालयात १६८ करोना रुग्ण उपचार घेत असताना तीन दिवसांपूर्वी प्राणवायू टाकीतून जोडलेल्या वाहिनीच्या जोडणीमधील छिद्रातून प्राणवायूची गळती झाली होती. दुपारी १२ वाजता गळतीची घटना समजल्यानंतरही पुरवठादाराने सायंकाळी साडेपाच वाजता दुरुस्तीसाठी एक कर्मचारी पाठविला. मात्र त्याच्याकडे दुरुस्तीसाठीची साधनेही नव्हती. त्याने काही तास प्राणवायू बंद करावा लागेल अशी उत्तरे आपत्तीच्यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे पुरवठादाराच्या हलगर्जीपणबाबत संताप व्यक्त होत आहे.

महिन्याभरापूर्वी ६ लाख लिटर क्षमता असलेल्या टाकीमध्ये प्राणवायूची साठवणूक करून त्याचा पुरवठा करणारी यंत्रणा उपजिल्हा रुग्णालयात पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली होती. महिना पूर्ण होण्यापूर्वीच त्यामध्ये बिघाड झाला. संबंधित पुरवठादार कंपनीने सर्व वाहिनींतील जोडणी व यंत्रणा तपासल्यानंतरच संबंधित यंत्रणा सुरू करण्यात आली होती, परंतु आपत्ती घडल्यानंतर कमीतकमी वेळेत रुग्णालयात पुरवठादार कंपनीच्या तज्ज्ञांचे पथक पोहोचणे अपेक्षित होते. मात्र तीन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेमध्ये प्रत्यक्षात पुरवठादाराकडून ही दक्षता पाळली गेली नाही. घटनास्थळी पोहोचलेले पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी तळोजा औद्योगिक वसाहतीमधील गोपाळ जैस्वाल यांच्या स्पेस प्रोजेक्ट इंजिनीअरिंग कंपनीच्या पथकाने दोन तासांमध्ये पूर्ण केले. विशेष म्हणजे आपत्तीच्या ठिकाणी येताना जैस्वाल यांच्या कंपनीच्या तज्ज्ञांनी दुरुस्तीसाठी लागणारी साधने सोबत आणली होती. या ठिकाणी प्राणवायूच्या वाहिनीतील जोडणीमध्ये छिद्र आढळले होते. तेथे ऑरगन वेल्डिंग तात्काळ करण्यात आली, तर गॅसकीट बदलण्यात आले. जैस्वाल यांच्या कंपनीने हे काम पूर्ण मोफत व सामाजिक सेवा मानून पूर्ण केल्यानंतर प्राणवायू टाकी व इतर यंत्रणा उभारणारा मूळ पुरवठादाराचा कर्मचारी घटनास्थळावर हजर झाला होता. १६८ जणांचे जीव टांगणीला लागलेल्या या आपत्तीच्या घटनेनंतर प्रशासनाने नेमका काय बोध घेतला, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. सध्या २४ तास प्राणवायूच्या टाकीवर ताण वाढला आहे. प्राणवायूच्या वाहिन्या व पुरवठ्याच्या यंत्रणेवर करोनासंकट काळ संपेपर्यंत तरी आरोग्याच्या आणीबाणी लक्षात घेत जैविक वैद्यकीय अभियंत्यांची येथे नेमणूक होणे आवश्यक आहे. अथवा जी मंडळी दररोज प्राणवायूच्या पुरवठ्याचे काम करते अशा मोठ्या कंपन्यांची तातडीने व काही दिवसांसाठी सरकारी अधिकाऱ्यांना मदत घेतल्यास हे प्रकार टळले जातील.

 

 

कोणतेही काम देताना संबंधित पुरवठादार कंपनीची आर्थिक व प्रात्यक्षिक पात्रता तपासून काम दिले जाते. वेळेत निरोप मिळूनही संबंधित पुरवठादार कंपनीचे तज्ज्ञ घटनास्थळी आपत्तीच्या वेळेत काही मिनिटांत पोहोचू शकले नाहीत, ही पनवेलकरांसाठी चिंता व्यक्त करणारी घटना आहे. महिन्याभरात ज्या व्यक्तीने या प्राणवायूची टाकीतील जोडणी व वाहिन्या तपासूनच कार्यान्वित करण्यास मंजुरी दिली त्यांनी त्या वेळी नेमके काय तपासले, असा प्रश्न आहे. – अरुण भिसे, सिटिझन युनिटी फोरम सामाजिक संस्था, पनवेल शहर