लैंगिक छळाच्या आरोपांमुळे नैराश्य आल्याची कबुली

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या प्रसिद्धीचे काम करणाऱ्या क्वॉन या कंपनीचा माजी सहसंस्थापक अनिर्बन दास याने गुरुवारी वाशी खाडीत आत्महत्येचा प्रयत्न केला.

मी टू चळवळ सुरू झाल्यानंतर त्याच्यावर चार महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.   गुरुवारी रात्री एकच्या सुमारास एक कार वाशी खाडीपुलावर थांबली. त्यातून अनिर्बन उतरला आणि खाडीकडे जाऊ लागला. त्याला वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी पाहिले. त्यांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक रोहन बगाडे यांच्यासह काही पोलिसांना त्याच्या मागोमाग पाठवले. अनिर्बन खाडीत उडी मारण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी त्याला पकडून चौकीत आणले.

आपल्यावर लैंगिक छळाचे आरोप करण्यात आल्याने आत्महत्या करणार होतो, अशी कबुली त्याने दिल्याची माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी लोकसत्ताला दिली.

दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, हृतिक रोशन इत्यादी कलावंतांची प्रसिद्धी सांभाळणाऱ्या क्वॉन या कंपनीचा सहसंस्थापक असलेल्या अनिर्बन दास याच्यावर चार जणींनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. अनिर्बनने आपल्याला मुलाखतीसाठी घरी बोलावले. तेथे त्याने विवस्त्र होण्यास सांगितले, असा आरोप एका महिलेने केला आहे. तर ऑडिशनसाठी आलेल्या एका महिलेला, ऑडिशन अशी बाहेर लोकांसमोर होत नाही तर बेडरूममध्ये केली जाते, असे सांगत त्याने तिला हॉटेलमध्ये बोलावल्याचा आरोप आहे.

अनिर्बनने अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्याविषयी विचारले होते, असाही आरोप आणखी एका महिलेने केला होता. एका अभिनेत्रीनेही अनिर्बनने वारंवार स्त्रियांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता.  या गंभीर आरोपामुळे क्वॉन कंपनीने त्याचा राजीनामा घेतला. तसेच दीपिका पदुकोणच्या सामाजिक संस्थेवरही अनिर्बन विश्वस्त होता. त्या पदावरूनही त्याची हकालपट्टी करण्यात आली.

मी टू चळवळीचा गैरवापर होऊ नये – उच्च न्यायालय

‘मी टू’ चळवळ चांगली असून तिचा गैरवापर केला जाऊ नये. ही चळवळ पीडित महिलांसाठी आहे, असे मत शुक्रवारी उच्च न्यायालयाने व्यक्त केले. दरम्यान, निर्माता-दिग्दर्शक विकास बहल याच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या ‘फॅण्टम फिल्म्स्’च्या माजी कर्मचारी महिलेने हे प्रकरण आपल्याला वाढवायचे नसल्याचे शुक्रवारी उच्च न्यायालयात सांगितले. त्यावर या महिलेला हे प्रकरण पुढे न्यायचे नसेल, तर याविषयी कुणालाही काही बोलण्याचा अधिकार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ‘मी टू’ चळवळ चळवळ पीडित महिलांसाठी आहे. त्या चळवळीच्या आडून कुणीही आपली मते मांडू नये किंवा तिचा गैरवापर करू नये, असे मत न्यायमूर्ती शाहरूख काथावाला यांनी नोंदवले. विकास बहलवर आरोप केलेल्या महिलेने आपल्याला हे प्रकरण पुढेही न्यायचे नाही, असे वकिलांमार्फत उच्च न्यायालयाला सांगितले.