वर्षांनुवर्षे एकाच विभागात असलेल्यांची अन्य विभागात उचलबांगडी

वर्षांनुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या १०५ कर्मचाऱ्यांच्या ४८ तासात बदल्या केल्यानंतर पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी आणखी १२५ कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी तयार केली आहे. यात एका विभागात सात ते आठ वर्षे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना तो विभाग पुन्हा मिळणार नाही याची तरतूद करण्यात आली आहे. पालिका प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही पोलिसांप्रमाणे एकाच विभागात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ मुसाफिरी करता येऊ नये यासाठी आयुक्तांनी ‘रामास्वामी फॉम्युला’ तयार केला आहे.

नवी मुंबई पालिकेत एकूण २३०० कायम स्वरूपी कर्मचारी सेवेत आहेत. याशिवाय दहा हजार कंत्राटी कामगार पालिकेचा गाढा हाकत आहेत. कायम सेवेतील २० टक्के कर्मचारी गेली अनेक वर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या विभागात कायम राहता यावे यासाठी ते साम दाम दंड भेद या सर्व नीतीचा उपयोग करीत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. यात नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्यांची मध्यस्थी महत्त्वाची मानली जाते.

गेली दीड वर्षे कर्मचाऱ्यांच्या या संस्थानांकडे कानाडोळा करणाऱ्या प्रशासनाला गेले  अनेक दिवस कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बायोमेट्रिक मशीनमुळे पर्दाफाश झाला. त्यामुळे आयुक्तांनी प्रथम १०५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन दुसऱ्या दिवशी त्यांची बदली केली. पहिल्या टप्प्यात ३५ कर्मचाऱ्यांची बदली केल्यानंतर बुधवारी ७० कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेश देण्यात आले. पालिकेच्या १८ ते २० विभागात पाच वर्षांपेक्षा जास्त काळ ठाण मांडणाऱ्या १२५ कर्मचाऱ्यांची दुसऱ्या टप्प्यातील बदलीसाठी यादी तयार करण्यात आलेली आहे. त्यांची पुढील आठवडय़ात बदलीची शक्यता आहे. त्यानंतर ही प्रक्रिया कायम सुरू राहणार असून कर्मचारी अधिकाऱ्यांच्या एका विभागातील सेवेचा फॉम्युला निश्चित करण्यात आलेला आहे. सध्या कारवाई करताना पाच वर्षांचा निकष वापरण्यात आला आहे, पण पुढील वर्षी हा कालावधी एप्रिलपासून तीन वर्षे निश्चित केला जाणार आहे.

त्यांची ‘अडगळीत’ बदली

पालिकेचा अडगळीतील विभाग म्हणजे नगरसचिव विभाग मानला जातो. या विभागात विषयपत्रिका तयार करणे आणि त्या नगरसेवकांना वाटप करणे इतके काम आहे. पालिकेच्या विविध बैठका आयोजित करण्याची जबाबदारी या विभागावर आहे. एका विभागात १२ वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा करणाऱ्यांना शिक्षा म्हणून बदली या विभागात केली जाणार आहे.

बदली झाल्यानंतरही पूर्वीच्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार थांबविले जाणार आहेत. परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही कर्मचारी, अधिकाऱ्यांना मूळ विभागात सेवा देता येणार नाही. पालिकेचा कारभार अधिक पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी एका विभागात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ यानंतर काम करता येणार नाही.

-डॉ. रामास्वामी एन., आयुक्त