शीव-पनवेल महामार्गावरील उरण फाटा उड्डाणपुलावरील काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात

नवी मुंबई</strong> :  शीव-पनवेल महामार्गावर सात वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या उरण फाटा उड्डाणपुलाच्या दोन मार्गिकांचे सध्या काँक्रिटीकरण सुरू आहे. येथे त्यामुळे सकाळ संध्याकाळ मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून येत आहे. ही वाहतूक कोंडी नेरुळ उड्डाणपूलापर्यंत जात असून आणखी २० दिवस वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने सात वर्षांपूर्वी २३ किलोमीटर शीव-पनवेल महामार्गावर काँक्रिटीकरण आणि सहा उड्डाणपुलांची उभारणी केली आहे. या मार्गाचे काम शीव पनवेल टोलवेज कंपनीला देण्यात आले होते. त्यांनी या मार्गाच्या फेर बांधणीवर एक हजार २०० कोटी रुपये खर्च केल्याने त्यांना कामोठे येथे टोल वसुलीचे कंत्राट देण्यात आले होते, मात्र भाजप सरकारने या टोलनाक्यावर हलक्या वाहनांना सूट दिल्याने कंत्राटदाराचा या मार्गावर झालेला खर्च वसूल करणे अवघड  झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील डागडुजी आणि फेरबांधणी सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाला करावी लागत आहे. पावसाळ्यात या मार्गावरील उड्डाणपुलावरील डांबरीकरणामुळे खड्डे पडले होते.  यामुळे काही दुचाकीस्वारांना जीवही गमवावा लागला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील उड्डाणपुलांवर  काँक्रिटीकरणास सुरुवात केली. शिरवणे येथील उड्डाणपुलाचे  काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर आता आता बेलापूर खिंडीतील उरण फाटय़ावरील उड्डाणपुलाचे काम मागील आठवडय़ापासून सुरू झाले आहे. पुण्याकडे जाणाऱ्या या पुलावरील दोन मार्गिकांच्या काँक्रिटीकरणासाठी मोठय़ा प्रमाणात चर खोदण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात असलेली वाहतूक पूलाखालून वळविण्यात आली आहे. त्यात एक मार्गिका सुरू ठेवण्यात आली आहे. जड वाहने पुलाखालून उरण वा पनवेलकडे जात आहेत.

पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना आणखी २० दिवस वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. या दोन मार्गिकांचे क्रॉक्रिटीकरण झाल्यानंतर पुण्याकडे जाणाऱ्या एका मार्गिकेचे काम हाती घेतले जाणार आहे.

-किशोर पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग