News Flash

आणखी पाचशे रुग्णशय्या

नवी मुंबई पालिकेने दुसऱ्या लाटेसाठी केलेली तयारीची प्रशासकीय पातळीवर प्रशंसा केली गेली आहे

तिसऱ्या लाटेसाठी महापालिकेची तयारी; बेलापूर येथील सात मजली इमारत ताब्यात

नवी मुंबई : करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट ही जास्त त्रासदायक राहणार असल्याचा इशारा केंद्रीय तसेच राज्य आरोग्य विभागाने दिल्याने नवी मुंबई पालिकेने कोणत्याही क्षणी येणाऱ्या या तिसऱ्या लाटेची तयारी ठेवली आहे. त्यासाठी बेलापूर येथील एक सात मजल्यांची इमारत व खारघर येथे बांधून तयार असलेले पाचशे रुग्णशय्यांचे रुग्णालय ताब्यात घेणार आहे. त्या संदर्भात करारनाम्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे.

नवी मुंबई पालिकेने दुसऱ्या लाटेसाठी केलेली तयारीची प्रशासकीय पातळीवर प्रशंसा केली गेली आहे; पण या काळात अतिदक्षता विभागातील रुग्णशय्या कमी पडल्याची तक्रार होती.

जागतिक आरोग्य संस्थेने तिसरी लाट सुरू झाल्याचे संकेत दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिसऱ्या लाटेला रोखण्याचे आवाहन जनतेला केले आहे. देशातील नागरिकांचा सुरू झालेला मुक्त संचार याला कारणीभूत असून पर्यटन स्थळांवर पावसाळी सहलीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी वाढू लागली आहे. नवी मुंबईतील काही पर्यटन स्थळांवरील नागरिकांना सोमवारी पावसाळी नाल्यांची पाण्याची पातळी अचानक वाढल्याने सुखरूप बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागली होती. विशेष म्हणजे या पावसाळी सहलीत पर्यटक आपल्या लहान मुलांना कडेवर घेऊन सहलीचा आनंद घेत होते. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याने तिसरी लाट अपरिहार्य असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे स्थानिक संस्थांनी तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली आहे. नवी मुंबई पालिकेने दुसऱ्या लाटेत काळजी केंद्रातील रुग्णशय्यांची संख्या पाच हजारांपर्यंत नेली होती, तर ऑक्सिजन रुग्णशय्या दीड हजारांपर्यंत होती. प्राणवायू रुग्णशय्यांची पालिकेची तयारी मात्र दोनशे रुग्णशय्यांपर्यंत होती. त्यामुळे हा तुटवडा जाणवत होता. त्यानंतर पालिकेने वाशी येथील कोविड काळजी केंद्रातच प्राणवायू प्रणालीच्या ७५ रुग्णशय्यांची व्यवस्था तातडीने केली होती. खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे नियंत्रण पालिकेने आपल्या हाती घेऊन स्थानिक रुग्णांना ८० टक्के प्राधान्य देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे दुसऱ्या लाटेतील दिवसागणिक होणारी दीड हजार रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. दोन लाटांतील अनुभवावरून नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे ही रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढणार असून कडक निर्बंध लागू करावे लागणार आहेत. पालिकेने आरोग्य विभागाच्या सायंकालीन आढावा बैठका पुन्हा सुरू केल्या असून दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट आरोग्य विभागाच्या दृष्टीने आव्हानात्मक असल्याने पालिकेने कोविड काळजी केंद्राबरोबरच रुग्णालयांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बेलापूर येथील एक बांधून तयार असलेली, मात्र भोगवटा प्रमाणपत्र नसलेली सात मजल्यांची इमारत ताब्यात घेण्यात आली आहे. पालिकेच्या पनवेल येथील इंडिया बुल्स इमारतीतील काळजी केंद्रावर टीका झाल्याने शहरापेक्षा पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या इमारतीपेक्षा बेलापूर येथील सात मजली इमारत कोविड काळजी केंद्रासाठी वापरली जाणार असून या ठिकाणी दोनशेपेक्षा जास्त रुग्णांची काळजी घेणे शक्य होणार आहे. पालिकेने या ठिकाणी रुग्णांना आवश्यक असलेल्या सुविधांची उभारण्यास तयारी सुरू केली आहे. याशिवाय खारघर येथील येरळा हे आयुर्वेदिक महाविद्यालयदेखील सिडकोबरोबर असलेल्या एका वादामुळे अडकून पडलेले होते. मात्र तो अडथळा दूर झाल्याने हे रुग्णालय पालिका समर्पित कोविड रुग्णालयासाठी ताब्यात घेणार असून या रुग्णालयाला त्याचा भाडेपट्टा मिळणार आहे. तिसऱ्या लाटेची पालिकेने अशा प्रकारे तयारी सुरू केल्याने शहरातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 12:42 am

Web Title: another five hundred beds municipal preparation corona third wave ssh 93
Next Stories
1 पुनर्वसन न झाल्यास जलसमाधी
2 ‘एनएमएमटी’त प्रवाशांची तुडुंब गर्दी
3 उत्सवांना करोना नियमांची चौकट
Just Now!
X