नवी मुंबई : राज्य शासनाने पन्नास वर्षांपूर्वी संपादित करून दिलेल्या ३४४ चौरस किलोमीटर क्षेत्रात पूर्वेकडील बाजूस एमआयडीसीत सिडकोची सुमारे २५० एकर जमीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिडको या जमिनीवर कामगारांसाठी एक लाख दहा हजार घरे बांधणार आहे.

सिडकोचा नियोजन विभाग या वसाहतीच्या विकास आराखडय़ावर सध्या काम करीत आहे. सिडकोने या भागात काही दगडखाणी भाडेपट्टय़ावर प्रकल्पग्रस्त आणि संस्थांना दिल्या होत्या. या दगडखाणींचा भाडेपट्टा करार संपल्याने आता ही जमीन सिडको विकसित करणार आहे.

दगडखाणी बंद पडल्याने दुर्लक्षित असलेल्या २५० एकर जमिनीचा ठावठिकाणा सिडकोच्या नियोजन विभागाला लागला आहे. या जमिनीवर सध्या एक लाख दहा हजार लोकवस्तीची वसाहत निर्माण करण्यासाठी आराखडा तयार केला जात आहे.

घरे कुठे? :  नवी मुंबईत दिघा ते शिरवणे या भागात १०३ दगडखाणी दररोज लाखो टन बांधकाम साहित्य निर्माण करीत होत्या. यात खासगी, वन, महसूल, एमआयडीसी आणि सिडको मालकीच्या जमिनींचा सहभाग होता. टप्प्याटप्प्याने यातील अनेक दगडखाणी बंद पडल्या. काही दगडखाणी बंद करण्यात आल्या. येथे वसाहती निर्माण करताना सिडको या दगडखाणींच्या डोंगराचे वन वैभव पुन्हा आणण्याचा प्रयत्न करणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या २५० एकर जमिनीवर कामगार वर्गासाठी वसाहती निर्माण करण्याचा सिडकोचा प्रयत्न राहणार आहे. सिडकोने आर्थिक निकषांनुसार यापूर्वीही वसाहती तयार केलेल्या आहेत. या वसाहती निर्माण करताना डोंगरांची निर्सगसंपदा पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

– लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको