महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणार

प्लास्टिक वापराचा मानवी आरोग्यावरील विपरीत लक्षात घेऊन भविष्यात प्लास्टिक वापर प्रतिबंध घालणारे अभियान  रविवारी, ८ जानेवारीला नेरुळ येथून राबविण्यात येणार आहे. या वेळी प्लास्टिक वापर टाळण्यासाठी जागृती करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने प्लास्टिक प्रतिबंधक अभियान  राबविण्यात येईल. शहरात विविध संस्था, मंडळे, महिला, ज्येष्ठ नागरिक, पर्यावरणप्रेमी नागरिक आणि धर्माधिकारी प्रतिष्ठानचे पाच  हजारहून अधिक कार्यकर्ते श्रमदान करणार आहेत. शहरात  ठिकठिकाणी पडलेले प्लास्टिक गोळा केले जाणार असून जागृती अभियान राबविले जाणार आहे.

स्वच्छ नवी मुंबई अभियानाचे सदिच्छादूत गायक-संगीतकार शंकर महादेवन आणि  अभिनेत्री जुही चावला हे आहेत. त्यांच्या  विशेष उपस्थितीत या अभियानाला सकाळी आठ वाजता नेरूळ येथील  सेक्टर १९ मधील  ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ येथून सुरुवात होईल. या वेळी येथील अ‍ॅम्फी थिएटरमध्ये या प्लास्टिक प्रतिबंधक अभियानअंतर्गत विशेष कार्यक्रम होणार आहे.

यात प्लास्टिकपासून निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर जुही चावला यांचा अभ्यास आहे. त्या या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील. शंकर महादेवन हे अनोख्या संगीत शैलीत प्लास्टिकपासूनचे धोके सांगतील.

पालिकेने ५०  मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली असून त्यादृष्टीने धडक कारवाई हाती घेतली. या वेळी अनेक व्यापारी आणि दुकानदारांना दंड ठोठावला.

प्लास्टिक गोळा करण्यासाठी तीन जादा वाहने

या प्लास्टिक प्रतिबंधात्मक अभियानांतर्गत कचरा गोळा करण्यासाठी विभागवार कचरा संकलन केंद्र निर्माण करण्यात आली असून प्रत्येक विभागासाठी तीन ज्यादा वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. एकत्रित प्लास्टिक कचरा तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी नेला जाणार असून त्याचा वापर रस्तेबांधणीसाठी केला जाणार आहे. याशिवाय पालिका उद्यानने आणि शाळांमध्ये प्लास्टिक बंदी घातली जाईल. तशी जागृती करणारे फलक सर्व ठिकाणी लावण्यात येणार आहेत.