13 November 2019

News Flash

‘त्या’ व्यक्तीला आणणाऱ्या रिक्षाचा शोध!

परिसरातील मोबाईलच्या ‘डम्पडाटा’चीही तपासणी

(संग्रहित छायाचित्र)

सीसीटीव्ही चित्रणावर पोलिसांची मदार; परिसरातील मोबाईलच्या ‘डम्पडाटा’चीही तपासणी

कळंबोली येथील सुधागड विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्फोटकांसह आढळलेली हातगाडी घेऊन येताना सीसीटीव्ही चित्रिकरणात आढळलेली व्यक्ती अन्य एका सीसीटव्ही चित्रिकरणात रिक्षातून उतरताना आढळला आहे. त्यामुळे स्फोटके ठेवणाऱ्या व्यक्तीला शोधण्यासाठी पोलिसांनी आता संबंधित रिक्षाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, बॉम्ब निकामी करण्यासाठी राज्य दहशतवादविरोधी पथकाची मदत घेण्यात आली असली तरी, या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची सूत्रे नवी मुंबई पोलिसांकडेच राहतील, असे पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी स्पष्ट केले आहे. कळंबोली वसाहतीमधील रविवार आणि सोमवारचा मोबाइल फोनचा ‘डम्पडाटा’तून काही हाती लागते आहे का, तसेच वसाहतीच्या मुख्य रस्त्यावरून हातगाडीवरून आणलेला बॉम्बचा प्रवास नेमका कुठून सुरू झाला याबाबत पोलीस तपास करत आहेत.

रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वसाहतीच्या झवेरी बाजारातील मुख्य रस्त्यावरून  एक व्यक्ती बॉम्ब ठेवलेली हातगाडी ढकलत शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत नेत असतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले आहे.  निळ्या रंगाचा शर्ट तसेच डोक्यात टोपी आणि टोपीखाली पांढऱ्या रंगाचा ओढलेला रुमाल यामुळे सीसीटीव्हीमध्ये संबंधित व्यक्ती अस्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी कळंबोलीतील सुमारे २० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत. यामध्ये हातगाडी ढकलणारी व्यक्ती एका रिक्षातून उतरल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ‘त्या’ व्यक्तीला आणणाऱ्या रिक्षाचाही शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी संबंधित बॉम्बमध्ये जोडलेल्या बॅटरीच्या मार्फत शोध सुरू केला आहे. मात्र त्यातून अद्याप हाती काही लागू शकले नाही. ज्या हातगाडीवरून बॉम्ब ठेवण्यात आला ती हातगाडी कोणाच्या मालकीची आहे. अशाच पद्धतीच्या हातगाडय़ा कोण बनवितो. वसाहतीमध्ये अशा हातगाडय़ा किती या सर्व प्रश्नांच्या शोधार्थ गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस आहेत. तिसऱ्या दिवशी कळंबोलीतील शाळा नियमित सुरू होत्या.  कळंबोली येथील जनजीवन सुरळीत झाले असले तरी सामान्यांच्या मनात अजूनही हा बॉम्ब शाळेच्या  प्रवेशद्वारावरच का ठेवला हा प्रश्न कायम आहे.

अद्याप संबंधित व्यक्तीचा शोध लागलेला नाही. नवी मुंबई क्राईम ब्रॅंच या प्रकरणाचा तपास करीत आहे. पोलिसांचे सर्व पथक काम करीत आहे. आम्ही मदतीसाठी व माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी ‘एटीएस’ची मदत घेतली होती.    – संजयकुमार, पोलीस आयुक्त, नवी मुंबई

First Published on June 20, 2019 9:49 am

Web Title: anti terrorism squad crime bomb blast