पालिकेच्या वतीने दोन फिरती वाहने सज्ज

नवी मुंबई</strong> : पालिकेने समूह तपासणी सुरू केली असतानाच फिरत्या वाहनातून प्रतिजन (अँटिजेन) चाचण्या घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितेल. त्यामुळे नागरिकांना चाचणीसाठी घरापासून दूर जावे लागणार नाही. या चाचण्यांचा खर्च पालिका करणार आहे.

नवी मुंबई शहरात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असून शहरात करोनाबाधितांची संख्या ८२७९ झाली असून दुसरीकडे शहरातील १५ लाख संख्येपैकी बुधवारपर्यंत शहरात फक्त २३,४४७ नागरीकांच्या करोना चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळेमागील आठवडाभरात दिवसाला सरासरी ७ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. पालिकाक्षेत्रात तुर्भे आणि ऐरोली तसेच विविध प्रभागात झोपडपट्टय़ा असून शहरातील नेरुळ, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या विभागांत  मोठय़ा प्रमाणात रुग्ण आढळत आहेत.  या पाच विभागांत बाधितांची संख्या एक हजारच्या वर आहे. त्यामुळे पालिकेने या विभागांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

सध्या सात  प्रयोगशाळांमधून या चाचण्या केल्या जात आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या वतीने परवानगी देण्यात आलेल्या खासगी प्रयोगशाळांमार्फत चाचणी केली जात आहे. परंतू आता पालिकेने घेतलेल्या निर्णयामुळे नागरीकांना घराजवळच आता या चाचण्या करून घेणे शक्य होणार आहे. याबाबत संबंधित प्रक्रिया राबविण्यासाठी लवकरच दोन फिरती वाहने प्राप्त होणार आहेत. शहरात दिवासकाठी साधारण पाचशे चाचण्या केल्या जात आहेत. त्यात  आता दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे.

घराजवळ करण्यात येणाऱ्या चाचण्यांमुळे बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध आणि अधिक धोका असलेल्या  नागरीकांची तात्काळ चाचणी करून घेणे शक्य होणार असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य विभाग उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांनी दिली.

तक्रारीनंतर निर्णय

शहरात अनेक वेळा ताप आल्यानंतर नागरीक तपासणीसाठी पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात व पालिकेच्या रुग्णालयात गेला असता तात्काळ तपासणी होत नसल्याच्या व अजून तुम्हाला कोणतेच लक्षणे दिसत नसल्याचे सांगून परत घरी पाठवले जाते. मात्र नव्याने त्रास सुरू झाल्यानंतर घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये संबंधित व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आल्याचे आरोपही मध्यंतरी करण्यात आले. त्यामुळे आता वेगवान आणि घराजवळच चाचण्या केल्या जाणार असल्याचे आयुक्त म्हणाले.