पालिकेची ‘ऑन कॉलिंग’ मोहिम लवकरच; खासगी रुग्णालय, क्लब, गृहसंस्थांमध्ये चाचण्या

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई : नवी मुंबईत ‘ऑन कॉलिंग’ प्रतिजन चाचणी सुविधा सुरू करण्यात आली असून खासगी रुग्णालयांबरोबरच शहरातील क्लब, विविध गृहसंस्थांमध्येच समूह चाचण्या करता येणार आहेत.

मुंबई शहरात करोना चाचण्यांची संख्या  मोठय़ा प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत आजवर केवळ चार टक्के नागरिकांच्या चाचण्या झाल्या आहेत.

सध्या २२ ठिकाणी प्रतिजन चाचण्या होत आहेत. शहरातील नागरिकांच्या जास्तीत जास्त चाचण्या होण्यासाठी नव्या कल्पनेतून शहरातील खासगी रुग्णालये, विविध क्लब आणि विविध गृहसंस्थांच्या  ठिकाणी प्रतिजन चाचण्या करता येणार आहेत.

या मोहिमेची सुरुवात लवकरच करण्यात येणार  असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.  शहरातील सर्व नागरी आरोग्य केंद्र, पालिकेची विविध उपनगरातील रुग्णालये, तसेच खासगी रुग्णालये, क्लब आणि गृहसंस्थांमध्ये आता या चाचण्या करता येणार आहेत. अनेक नागरिक आजाराकडे दुर्लक्ष करीत आहेत.

त्यामुळे चाचण्यांअभावी  संसर्ग वाढत आहे. नवी मुंबईची तरंगती लोकसंख्या जवळजवळ  १५ लाखांच्यावर असताना फक्त काही हजारांत नागरिकांच्या चाचण्या झाल्या आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेकडूनही जास्तीत जास्त चाचण्या केल्यावर वेळेत उपाय लवकर करता येत असल्याचे सांगीतले आहे.नवी मुंबईत करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तत्कालिन आयुक्त मिसाळ यांच्या काळात ही टक्केवारी १.५ पर्यंत होती.परंतू आयुक्त बांगर यांनी आयुक्तपदाचा कारभार स्वीकारताच सर्वात प्रथम प्रतिजन चाचण्या सुरु केल्या आहेत.

आजवरच्या चाचण्या

’ १४ जुलैपर्यंत चाचण्या २६६३१

’ ५ ऑगस्टपर्यंतची संख्या— ५८,८१३

प्रतिजन चाचण्यांमुळे मागील १५ दिवसात चाचण्यांची संख्या वाढली आहे.परंतू शहरात अधिक मोठय़ा प्रमाणात चाचण्या करता येण्यासाठी ऑन कॉलिंग प्रतिजन चाचण्या करता येणार आहेत. यासाठी आवश्यक मनुष्यबळाची तरतूद करण्यात येत आहे.

 -अभिजीत बांगर, पालिका आयुक्त