‘मिशन झिरो’ अंतर्गत रुग्णांचा शोध घेणार; ४० वाहने सज्ज

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात ‘मिशन झिरो’ अंतर्गत  रुग्णांचा तातडीने शोध घेण्यासाठी पालिकेच्या वतीने भर दिला जात आहे. यासाठी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून गृहसंस्था आणि वसाहतींमध्ये फिरती चाचणी सुविधा करण्यात आली आहे. यात प्रतिजन चाचण्या केल्या जाणार आहेत. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आणि पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या वेळी धर्मेशभाई जैन, विजय लखानी, राहुल नाहटा, राजुल व्होरा, शिल्पिन तातर आणि डॉ. विवेकानंद सावंत आदी उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत करोनावर मात करण्यासाठी  ‘मिशन झिरो’ मोहीम सुरू करण्यात आली आहे.

शहरात रुग्ण आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध आणि त्याचे विलगीकरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेने अर्ध्या तासात तपासणी अहवाल प्राप्त होणाऱ्या प्रतिजन चाचण्यांवर भर दिला आहे. शहरात जवळजवळ २५ प्रतिजन चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. करोनाविषयक जागृतीसाठी सहा प्रचाररथ तयार करण्यात आले आहेत. त्यावर जिंगल्स, संवाद, निवेदन या माध्यमातून महानगरपालिका क्षेत्रात ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे. तर  दुसऱ्या ठिकाणी तेथे प्रतिजन चाचण्या करण्यात येणार आहेत.

प्रामुख्याने शहरातील ज्येष्ठ नागरिकांबरोबरच  मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, किडनीचे विकार असणाऱ्या नागरीकांच्या चाचण्या करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासोबतच करोनाची खोकला, ताप, सर्दी, श्वस घेण्यास त्रास अशी लक्षणे असणारम्य़ा व्यक्तींच्या प्रतिजन चाचण्या करण्यात येणार आहेत. सोसायटी, वसाहतीमार्फत प्रतिजन टेस्ट करावयाची मागणी झाल्यास त्या ठिकाणीही’ऑन कॉल प्रतिजन चाचणी सुविधा’उपलब्ध करुन दिली जाणार  आहे.यासाठी

सध्या ४० वाहने सज्ज करण्यात आली आहेत. ३४ गाडय़ांच्या मदतीने चाचणी करण्यात येतील तर ६ मोबाइल व्हॅन करोनाच्या चाचणीसाठी प्रचार करतील, असे नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.