रक्तदान शिबिरे बंद असल्याने संकलनावर परिणाम

शेखर हंप्रस, लोकसत्ता

नवी मुंबई</strong> : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत, मात्र त्याचे अनेक परिणामही समोर येऊ लागले आहेत. आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक तातडीची सेवा असलेल्या रक्तपुरवठय़ावरही याचा परिणाम होण्याची चिंता आता व्यक्त होऊ लागली आहे. रक्तदान शिबिरेच होत नसल्याने संकलनावर मोठा परिणाम होत असून कर्करोग रुग्णांसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.

गर्दी टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे रक्तदान शिबिरे घेता येत नाहीत, तर दुसरीकडे स्वयंस्फूर्तीने रक्तपेढीत जाऊन रक्तदान करणारे दाते दुर्मीळ झाले आहेत. त्यामुळे रक्तपेढय़ा रिकाम्या पडू लागल्या आहेत. ‘कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान करण्यास घाबरू नका, गरजू रुग्णांचे प्राण वाचावा’ असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे.

महाराष्ट्रात दर दिवशी सुमारे ५ हजारच्या घरात रुग्णांना गंभीर आजाराला सामोरे जाताना तातडीच्या शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त, थॅलेसिमिया, हिमोफिलिया तसेच विविध कर्करोग विशेषत: ल्युकोमिया (रक्ताचा कर्करोग) रुग्णांना सर्वाधिक रक्ताची गरज असते.

मात्र सध्या रक्तदान शिबिरे भरत नाहीत. आगामी दोन महिने शैक्षणिक सुट्टय़ा असल्याने रक्तदान कमी होणार आहे. त्यामुळे रक्तपुरवठय़ाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

कोरोना किंवा कर्करोग हे दोन्हीही गंभीर आजार आहेत. मुंबईत कोरोनाचे शंभरच्या आत रुग्ण, तर देशात २००च्या पुढे आहेत. मात्र कर्करोगाचे मुंबईत आणि देशात लाखो रुग्ण आहेत. महत्त्वाचे म्हणजे रक्तघटक (प्लेटलेट) याची या रुग्णांना मोठी आवश्यकता असते. जर रक्तपेढय़ांवर शुकशुकाट राहिला तर ही समस्या भविष्यात गंभीर होऊ  शकते असे संवेदना रुग्णसेवा संस्थेचे अध्यक्ष प्रसाद अग्निहोत्री यांनी सांगितले.

केवळ मुंबईत रोज किमान ८०० ते १००० आणि राज्यात ५ हजारच्या घरात रक्त बाटल्यांची गरज आहे. रक्तदान शिबीर भरत नसल्याने रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. पुढील काळात अशीच परिस्थिती राहिली तर गंभीर संकट निर्माण होऊ शकते. यावर उपाय म्हणून स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणे आवश्यक आहे.

– डॉ. अरुण थोरात, साहाय्यक संचालक, रक्त संक्रमण परिषद

रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना रक्तपुरवठा वेळेत व्हावा यासाठी या काळात योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. सर्वाधिक रक्तपुरवठा हा रक्तदान शिबिरातून होतो. मात्र तीच बंद आहेत. त्यामुळे चिंता आहे. कोरोना विरोधाच्या लढाईत नागरिक सहभाग घेत आहेत तसेच स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे.

– डॉ. राजीव जाधव, सद्गुरू रक्तपेढी