व्यापाऱ्यांनी दिलेले धनादेश न वटल्याने नगर जिल्ह्य़ातील कोबी उत्पादक संतप्त

अहमदनगर जिल्ह्य़ातील २० शेतकऱ्यांना पडला आहे. तुर्भे येथील घाऊक भाजी बाजारातील दोन व्यापाऱ्यांना आठ महिन्यांपूर्वी ३०  हजार टन कोबी पाठवूनही त्यांचे पैसे न मिळाल्याने या २० शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे. या व्यापाऱ्यांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

कांद्याच्या कमी उत्पादनामुळे मूठभर शेतकऱ्यांचे चांगभलं झाले आहे, पण मोठय़ा प्रमाणातील कांदा उत्पादकांचा कांदा शेतात खराब झाल्याचे दिसून येते. भाजी शेतकऱ्यांचीही स्थिती काही वेगळी नाही. उन्हाळ्यात मार्च एप्रिल दरम्यान अहमदनगर येथील किशोर पवार, केरु दराडे आणि जलालुद्दीन शेख या आणि त्यांच्यासारख्या इतर १७ शेतकऱ्यांनी ३० हजार टन ट्रक भरून कोबी एपीएमसी बाजारातील अभिजित कांडकेर आणि असिफ कुरेशी या व्यापाऱ्यांकडे पाठविला. त्याची पट्टी पावती न करता एका साध्या कागदावर कोबीचा झालेला भाव आणि त्याचे एकूण येणारे पैसे लिहून देण्यात आले.

त्यानंतर कोबीचे पैसे मिळावेत यासाठी नगरच्या या सहा शेतकऱ्यांनी अनेक वेळा भाजी बाजारात पायताणे झिजवली मात्र त्यांना पैसे मिळाले नाहीत. सातत्याने पैशासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी अनेक वेळा दमदाटी केल्याची तक्रारही पोलिस ठाण्यात करण्यात आलेली आहे. अखेर बाजारातील काही व्यापाऱ्यांच्या मध्यस्थीने या शेतकऱ्यांना बारा लाख रुपयांचा चेक वाहतूक दार व शेतकरी किशोर पवार यांच्या नावाने देण्यात आला. तो धनादेशही नंतर तो वटला नाही. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे, मात्र त्याबाबतही अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही.

एपीएमएसी अशा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीच स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे एपीएमसी कार्यालयातही शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी तीस डिसेंबर पर्यंत पैसे देण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांनी दिले आहे. यात लवकर न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनाच साकडे घातले आहे.

शेतीतून मिळणाऱ्या उत्पनांवर संसार सुरु आहे. नगर जिल्ह्य़ातील वीस शेतकऱ्यांनी कोबी घाऊक बाजारात पाठवली पण त्याचे पैसे मिळालेले नाहीत. धनादेश देऊन फसवणूक केली गेली आहे. आता ३० डिसेंबपर्यंत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

-किशोर पवार, शेतकरी