दिवसेंदिवस देशासह  राज्यात विशेषत मुंबई शहरात करोनाचा कहर वाढत आहे. करोना विषाणूचा संसर्ग वाढत असून मसाला बाजारातील ऐका व्यापाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एपीएमसी बाजार समितीतील सर्व व्यापारी वर्ग भयभीत झाला असून बाजारातही करोना दाखल झाल्याच्या धसकेने व्यापाऱ्यांच्या मागणीने कांदा, बटाटा, फळबाजार आणि भाजीपाला बाजार शनिवार दिनांक ११ पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला आहे.

मसाला बाजारातील मुंबईत स्थायिक व्यापाऱ्याला करोनाची लागण झाल्याने एपीएमसी बाजार समितीत एकच खळबळ माजली असून माथाडी कामगार, व्यापारी तसेच वाहतूकदार यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे कांदा बटाटा अडत व्यापारी संघ , कांदा बटाटा संचालक अशोक वाळुंज यांनी कांदा बटाटा व्यापारी यांच्या बैठक घेऊन बाजार अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. करोना या जागतिक रोगाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा म्हणून बाजारामधील कामकाज  सुरू ठेवण्यात आले होते. या रोगाचा संसर्ग आणि प्रसार रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न चालू आहेत. बाजार समिती प्रशासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र तरी देखील महाराष्ट्रातील विशेषत मुंबईतील परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. तेथील करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कांदा बटाटा मार्केटमधील ८०% व्यापारी, कामगार बाजार घटक बाजारात येत नाही. २०% बाजार घटकाचे कामकाज चालू आहे. या बाजारात करोना विषाणूचा संसर्ग आणि प्रसार रोखण्यासाठी  संघटनेने तुभ्रे मुख्य कांदा बटाटा आवारामधील शिल्लक असलेला माल एक दिवसांमध्ये बाहेर काढण्यात येईल. तसेच मार्केटमध्ये व्यवसाय करण्यासाठी माथाडी, मापाडी, मेहता, वारणार इत्यादी बाजार घटक उपलब्ध नाहीत त्यामुळे सोमवार दिनांक ११ मार्चपासून बाजारातील  कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एपीएमसी बाजार समितीत मुंबई उपनगरातील ७०% ते ८० %ग्राहक दाखल होतात. सध्या मुंबईत परिस्थिती गंभीर होत चालली आहे.त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव बाजार बंद करण्याचा निर्णय घेत आहोत असे मत फळ बाजार संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केले आहे. कांदा बटाटे बाजारातदेखील मुंबईमधील ग्राहक मोठय़ा संख्येने दाखल होत असतात, त्यामुळे आम्ही कोणताही धोका ओढवून घेणार नाही तसेच अत्यावश्यक सेवा म्हणून राहिलेला माल एका दिवसांत मुंबई उपनगराना पुरवठा करू, तसेच मुंबईत महिन्याचा कांदा बटाटा साठा मुबलक प्रमाणात आहे, असे मत कांदा बटाटा संचालक अशोक वाळुंज यांनी व्यक्त केले आहे.

तसेच एपीएमसी प्रशासनाने व्यापारी, अडते यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल हा मुंबई उपनगरात  घाऊक व्यापाऱ्यांना थेट पुरवठा करण्याचे नियोजन करावे; जेणेकरून मुंबईत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही.

कांदा,बटाटा, भाजीपाला आणि फळबाजारातून बंद ठेवण्याबाबत पत्र देण्यात आले होते. मुंबईतून बाजारात मोठय़ा प्रमाणात ग्राहक येत असतो, मुंबई ही सध्या करोनाची हॉटस्पॉट ठरत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शनिवार दि.११ पासून पुढील आदेश येईपर्यंत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

-अनिल चव्हाण, सचिव, एपीएमसी