दिवसेंदिवस राज्यात करोनाचा कहर वाढत आहे. ‘करोना’चा संसर्ग रोखण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्य हितासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती २५ ते ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.

करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून तसेच पालिका प्रशासनाकडून शहरात गर्दी कमी करण्यास सूचना देण्यात येत आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही सर्वात मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी जवळजवळ २५ ते ३० हजार नागरिकांची दररोज वर्दळ असते. या ठिकाणी एपीएमसी प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेतलेली नाही. तसेच बराच माथाडी वर्ग, कर्मचारी गावी गेला असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी व्यापाऱ्यांनी २५ ते ३१ मार्चपर्यंत बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

भाजीपाला बाजार २४ मार्चला सुरू राहणार असून २५ मार्चला पाडव्यानिमित्त सुट्टी असून तो ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय भाजीपाला व्यापारी महासंघाने घेतलेला आहे. तसेच फळ बाजारात काही माल शिल्लक असून मंगळवारी मार्केट सुरू ठेवण्यात येणार आहे, मात्र २५ ते ३१ पर्यंत बंद करण्याचा निर्णय व्यापारी वर्गाने घेतलेला आहे. कांदा-बटाटा बाजारात ५० ते ६० गाडय़ा माल शिल्लक असून २५ ते ३१ मार्चपर्यंत मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे. धान्य बाजारात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाच्या वतीने अद्याप ३१ मार्चपर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.

– अनिल चव्हाण, सचिव   एपीएमसी

भाजीपाला बाजारात दररोज एक हजार गाडय़ांची आवक होत असते तसेच १० हजार नागरिकांची वर्दळ असते, त्यामुळे मोठय़ा प्रमाणात गर्दीतून करोनाचा संसर्ग होऊ  शकतो. तसेच राज्य सरकारने १४४ कलम लागू केल्याने स्वयंस्फूर्तीने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे.

– प्रशांत जगताप, भाजीपाला घाऊक व्यापारी, एपीएमसी

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज २५ ते ३० हजार नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी गर्दी होऊन करोना संसर्ग होऊ  शकतो. तसेच येथील कर्मचारी माथाडी वर्ग गावी गेले असल्याने येथे काम करण्यासाठी कर्मचारी नाहीत. जे कर्मचारी उपस्थित आहेत त्यांच्या आरोग्यहितासाठी व्यापारी वर्गाने हा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

– संजय पानसरे, फळ घाऊक व्यापारी, एपीएमसी