तीन हजार व्यापारी गाळ्यांमध्ये नियमबाह्य़ बांधकाम

शहरी, ग्रामीण आणि झोपडपट्टीतील बेकायदा बांधकामांवर एकाचवेळी कारवाई सत्र सुरू करणाऱ्या नवी मुंबई पालिकेची नजर आता एपीएमसी बाजारातील बेकायदा बांधकामांवर पडली आहे. एपीएमसी प्रशासनाने ही कारवाई करण्यास पालिकेला पूर्ण अधिकार असल्याचे सूचित केले आहे. त्यामुळे येत्या काळात एपीएमसीतील पाच घाऊक बाजारपेठेत तीन हजार व्यापाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात केलेल्या बेकायदा बांधकामांवर हातोडा पडणार आहे.

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करताना कोणताही दुजाभाव करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पावसाळ्यानंतर या कारवाईला वेग आला असून गुरुवारी ऐरोली येथील बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा चालविण्यात आला. शहरी, ग्रामीण आणि झोपडपट्टी भागातील बेकायदेशीर बांधकामांवर एकाच वेळी कारवाई केली जात असताना एपीएमसी घाऊक बाजारातील पाच बाजारपेठेत असलेल्या तीन हजार व्यापाऱ्यांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र होते. मुंढे यांच्या आदेशाने गतवर्षी जून महिन्यातच मसाला बाजारातील अशा ३४ व्यापाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली होती. या व्यापाऱ्यांनी त्यांच्या गाळ्यात केलेल्या अंतर्गत बदलामुळे पालिकेने गाळे सील केले होते. त्यानंतर यातील काही व्यापाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थागिती आणली होती. आशिया खंडातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या तुर्भे येथील एपीएमसी बाजारपेठेची उभारणी सिडकोच्या माध्यमातून करण्यात आली असून त्याचे गाळे वितरण एपीएमसीने केलेले आहे. त्यामुळे ही कारवाई एपीएमसीने करावी असा कांगावा करण्यात आला होता. त्यामुळे पालिकेने एपीएमसीला एक पत्र देऊन बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याला एपीएमसी प्रशासनाने उत्तर दिले आहे.

बेकायदेशीर बांधकामासंदर्भात एपीएमसीकडे कारवाईची विचारणा करण्यात आली होती. बेकायदेशीर बांधकामे ही व्यापाऱ्यांनी कोणतीही परवानगी घेऊन केलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार नियोजन प्राधिकरण म्हणून पालिकेला आहे. असे एपीएमसीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कारवाईचा हा मार्ग मोकळा झाला असून लवकरच कारवाई केली जाणार आहे.

डॉ. कैलाश गायकवाड, उपायुक्त (अतिक्रमण) नवी मुंबई पालिका