सातशे ते नऊशे रुपये किलो; १,५०० डझनाची आवक
नवी मुंबई : गेली तीन वर्षे आफ्रिका खंडातील मालवी देशातून भारतात येणाऱ्या हापूस आंब्याने मुंबई बाजार समितीच्या घाऊक बाजारात पिंगा घालण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यात कोकणातील हापूस आंब्याची निर्माण झालेली पोकळी हा आंबा भरून काढत आहे. बुधवारी नवी मुंबईतील घाऊक फळ बाजारात एक हजार ५०० डझनाची सुरू झालेली आवक आता हळूहळू वाढणार असून ती डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत राहणार आहे. गेल्या आठवडय़ात दिल्लीत हा हापूस दाखल झाला होता पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
कोकणातील हापूस आंब्याची अवीट चव जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या आंब्याची लागवड व्हावी यासाठी देशातील अनेक राज्यांनी प्रयत्न सुरू केले असून दक्षिण भारतातील हापूस आंबा कोकणातील हापूस आंब्याला टक्कर देण्यास उतरला आहे.
जानेवारी ते जूनपर्यंत असलेल्या या हंगामामुळे इतर महिन्यात हापूस आंब्याची केवळ प्रतीक्षा करण्याशिवाय हापूस आंबा खवय्यांना दुसरा पर्याय शिल्लक नाही. मागील तीन वर्षांपासून मात्र कोकणातील हापूस आंब्याची आठवण करून देणारा मालवी देसाातील हापूस आंबा देशातील फळ बाजारात येऊ लागला आहे.
नऊ ते दहा वर्षांपूर्वी दापोली व रत्नागिरीमधून हापूस आंब्यांची रोपे घेऊन मालवी प्रांतात एक हजार ५०० एकरवर मालवी मँगोज कंपनीने व्यावसायिक लागवड केली आहे. कोकणसारखीच भूमी आणि वातावरण असलेल्या या प्रांतात आता हापूस आंब्याची लागवड वाढली असून या कंपनीने देशातील दिल्ली, चेन्नई आणि मुंबईत निर्यात सुरू केली आहे.
दिल्लीत फारसा प्रतिसाद न लाभलेल्या हापूस आंब्याने आता मुंबईकडे मोर्चा वळविला असून तुर्भे येथील एपीएमसी घाऊक फळ बाजारातील आंब्याचे व्यापारी व संचालक संजय पानसरे यांच्याकडे बुधवारी एक हजार पाचशे डझन हापूस आंबा पाठविण्यात आला आहे. त्यातील पाचशे डझन हापूस आंबा हा पुणेकरांसाठी पाठविण्यात आला असून त्याला चांगला प्रतिसाद आहे.
हा हापूस आंबा सातशे ते नऊशे रुपये किलोने विकला जात आहे. गेल्या वर्षी हाच हापूस आंबा आकारानुसार ११०० ते १८०० रुपये प्रति डझन विकला गेला आहे. हापूस आंब्याचे खवय्ये हा आंबा विकत घेत आहेत. या हापूस आंब्याला चांगली मागणी असल्याचे पानसरे यांनी स्पष्ट केले आहे. पुढील महिन्याच्या माध्यान्हापर्यंत हा हापूस आंबा देशातील फळ बाजारात पिंगा घालणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2020 2:09 am