पालिका आयुक्तांकडून पाहणी; तर बाजार बंदचा इशारा

नवी मुंबई : भरारी पथके नेमल्यानंतरही एपीएमसी बाजार आवारात नियमांचे पालन होत नसल्याने बुधवारी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वत: एपीएमसीत पाहणी केली. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देत बेशिस्तीला आळा न आल्यास बाजार बंदचाही इशारा दिला आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाचही बाजार ही गर्दीची ठिकाणे आहेत. या ठिकाणी सामाजिक अंतराचे नियम पाळून व्यापार करावा अशी अट घालण्यात आली आहे. मात्र या नियमाला या ठिकाणी हरताळ फासला जात आहे. सर्व व्यवहार पूर्ववत झाल्याने या बाजारात पुन्हा गर्दी वाढली आहे.

याची दखल घेत पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी एपीएमसीवर लक्ष केंद्रित केले आहे. काही दिवसांपूर्वी बेशिस्तीला आळा घालण्यासाठी भरारी पथकांद्वारा कारवाई सुरू केली आहे. तरीही एपीएमसीत नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे आयुक्तांनी बुधवारी एपीएमसीतील बाजार आवारांना भेट देत पाहणी केली.

बाजार तसेच शहरात कोणत्याही नागरिकाने समाजिक अंतर, मास्कचा वापर केला नाही तर हयगय न करता त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे सांगितले. एपीएमसी प्रशासन आणि व्यापारी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. आर्थिक क्षमता नाही अशा कामगारांकडून दंड वसूल करण्यापूर्वी त्यांना मास्क देण्याच्या एपीएमसी प्रशासनाला सूचना केल्या. तसेच बाजारात केवळ अधिकृत व्यापाराला परवानगी द्यावी. किरकोळ व्यापार अधिकृत नाही, त्यामुळे त्याला परवानगी नाही, असेही त्यांनी सांगितले. पालिकेतर्फे भरारी पथके नेमली आहेत. त्यांच्याकडून नियम न पाळाणाऱ्यांना दंड आकारला जाईल. दंड वसूल करूनही कोणी ऐकत नसेल तर त्याचा गाळा, व्यवयसाय बंद करण्याच्या सूचना त्यांनी एपीएमसी प्रशासनाला दिल्या आहेत.

चाचण्या वाढवा

महापालिकेकडून बाजार आवारात करोना चाचणी केंद्रे सुरू आहेत. प्रतिजन व ‘आरटीपीसीआर’ दोन्ही चाचण्या करण्याची व्यवस्था आहे. तेथे दररोज जास्तीतजास्त चाचण्या व्हाव्यात यासाठी एपीएमसी प्रशासनाने प्रयत्न करावेत. प्रत्येक घटकाने चाचणी करूनच बाजारात प्रवेश करावा. ही प्रक्रिया वारंवार सुरू राहिली तरच करोनावर नियंत्रणासाठी मदत होईल असे आयुक्तांनी सांगितले.

कोणावर विनाकारण कारवाई होणार नाही, मात्र जे आरोग्याविषयी बेफिकीर आहेत, त्यांना शिस्त लावणे गरजेचे आहे. त्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. बाजार समिती नाइलाजास्तव पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ  नये यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करावे.

– अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका