नवी मुंबई : शासनाच्या आदेशानंतर करोनाचे सावट असताना बुधवारपासून पुन्हा एकदा एपीएमसीतील कांदा बटाटा व भाजीपाला मार्केट सुरू करण्यात आले आहे. गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने आवश्यक गाडय़ांनाच एपीएमसीत प्रवेश देण्यात येणार असून या पाचही बाजारांवर ड्रोन कॅमेरा नजर ठेवणार आहे.

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही सर्वात मोठी बाजार समिती असून या ठिकाणाहून मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांना शेतमाल पुरवठा करण्यात येतो.  मात्र गेल्या आठवडय़ात येथील मसाला बाजारामधील मुंबईत राहणाऱ्या एका व्यापाऱ्याला करोनाचा संसर्ग झाला. त्याचप्रमाणे या बाजारांत मुंबईतून मोठय़ा प्रमाणात खरेदीदार येत असल्याने करोना संसर्गाचा धोका वाढल्याने आणि  व्यापारी व माथाडींनी बाजारसमिती बंदची मागणी लावून धरल्याने बाजार बंद करण्यात आली. मात्र टाळेबंदी कालावधी ३ मे पर्यंत वाढविण्यात आल्याने शासनाने गर्दीवर नियंत्रण ठेवत बाजार सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारपासून कांदा-बटाटा व भाजीपाला बाजार सुरू करण्यात आला आहे. बुधवारी भाजीपाल्याच्या १९१  तर कांदा-बटाटाच्या १३५ गाडय़ांची आवक झाली.

या ठिकाणी शेतमाल खरदेसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. यामुळे करोना संसर्गाचा धोका असल्याने बाजारात मर्यादित गाडय़ांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.  गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी  पोलीस ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवणार आहेत.