एप्रिलमधील घोषणेनंतर कार्यवाही थांबलेलीच; व्यापाऱ्यांशी पुन्हा चर्चेचे आयोजन

पूनम सकपाळ, लोकसत्ता

नवी मुंबई</strong> : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दी नको, असा केवळ आदेश देऊन प्रशासन मोकळे होते. तरीही करोना संसर्गानंतरच्या काही दिवसांपासून ‘एपीएमसी’च्या आवारात गर्दी होतच आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अनेक उपायांपैकी ‘अ‍ॅप’निर्मिती हा एक उपाय ‘एपीएमसी’ प्रशासनाने गेल्या एप्रिलमध्येच योजला होता. यातून किरकोळ विक्रेत्यांना ऑनलाइन खरेदी करता येणे शक्य होणार आहे; परंतु आता अर्धा जुलै सरूनही ‘अ‍ॅप’विषयीचा एक शब्दही कागदावर उतरलेला नाही.

नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात करोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब होती. ‘एपीएमसी’आवारात येणारे अनेक घटक हे कोपरखैरणे येथे राहणारे आहेत. त्यामुळे आवारात कमीत कमी घटकांची उपस्थिती राहावी, यावर व्यवस्थापनाने भर दिला होता. त्याच वेळी ‘एपीएमसी’ आवारच बंद करण्याची सूचना अनेकांकडून करण्यात आली होती. त्यानंतर आवारातील काही बाजार टप्प्याटप्प्याने बंदही ठेवण्यात आले. मात्र, जीवनाश्यक वस्तूंसाठीचे महत्त्वाचे ठिकाण म्हणून ते सुरू ठेवण्याचीही गरज बोलून दाखविण्यात आली.

यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने करोनाकाळात उच्चस्तरीय पातळीवर अनेक बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये किरकोळ विक्रेत्यांच्या संख्येवर मर्यादा आणण्यासाठी ५० वर्षांवरील व्याधिग्रस्त व्यक्तींना आवारात प्रवेशास मनाई करण्यात आली.

प्रशासनाने शेतमालाची ऑनलाइन खरेदी करता यावी, यासाठी ‘अ‍ॅप’निर्मितीचा पर्याय निश्चित करण्यात आला. या सुविधेत ग्राहकांनी ऑनलाइन मालाची नोंदणी केल्यानंतर व्यापारी, अडते आणि वाहतूकदार मागणीनुसार शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचवतील. या ‘अ‍ॅप’च्या उपयोगासंदर्भातील शक्याशक्यता पडताळून पाहण्यात आल्या.  जूनमध्ये ‘अ‍ॅप’ची प्राथमिक स्वरूपातील तपासणी केल्यानंतर ते सुरू करण्यात येणार होते.

मंजुरीची प्रतीक्षा

सध्या या  ‘अ‍ॅप’चे कागदोपत्री कामकाज सुरू आहे.  प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर इच्छुक कंपन्यांनी सहभागी होण्यासाठी अर्ज करायचा आहे. त्यांनतर बाजार समितीच्या मागणीनुसार कोणती कंपनी हे अ‍ॅप सुविधांसह उपलब्ध करून देईल, हे निश्चित होईल.

अडचणी काय?

टाळेबंदीत ‘एपीएमसी’च्या कार्यालयात पाच ते दहा टक्के कर्मचारीच उपस्थित होते. यात काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. ‘अ‍ॅप’वरील व्यवहार सुरळीत होण्याबाबतच्या शक्याशक्यता पडताळण्यासाठी व्यापारी तसेच ऑनलाइन खरेदीसाठी लागणाऱ्या घटकांची चाचपणी करण्यात आली. काही व्यापाऱ्यांनी त्याला विरोध केला.

ऑनलाइन खरेदीसाठी ‘अ‍ॅप’च्या पर्यायावर बाजारातील सर्व घटकांची लवकरच बैठक घेण्यात येईल. त्यानंतर त्याची प्राथमिक चाचणी घेतली जाईल.

– अनिल चव्हाण, सचिव एपीएमसी