30 May 2020

News Flash

खासगी कोविड रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट

नवी मुंबईत मनमानी शुल्क आकारणी

नवी मुंबईत मनमानी शुल्क आकारणी

नवी मुंबई : एकीकडे महापालिका रुग्णालयांत खाटा शिल्लक राहिल्या नसताना, नवी मुंबईतील खासगी कोविड रुग्णालयांनी करोना उपचारासाठी रुग्णांकडून अवाजवी शुल्कवसुली आरंभली आहे. या रुग्णालयांत उपचारासाठी रुग्णांना किमान दीड ते दोन लाख रुपये खर्च येत आहे. गरीब रुग्णांसाठी हा खर्च आजारापेक्षाही अधिक तापदायक ठरू लागला आहे. खासगी रुग्णालयांतील करोना उपचारांसाठी राज्य सरकार तसेच मुंबई-ठाणे या पालिकांनी दरनिश्चिती केली आहे. मात्र नवी मुंबई महापालिका प्रशासनाने यासंदर्भात कोणतीही पावले न उचलता रुग्णांच्या लुटीला मदतच केली आहे.

नवी मुंबई महापालिकेने करोना उपचारासाठी वेगवेगळ्या स्तरांवर यंत्रणा उभी केली आहे. यानुसार ज्या रुग्णांना अति सूक्ष्म लक्षणे आहेत अशांसाठी वाशी, सीबीडी, पनवेल आणि घणसोली येथे कोविड उपचार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या कोविड उपचार केंद्रांमधून रुग्णांच्या विलगीकरणासाठी १३०० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना दाखल केले जात नाही. तीव्र लक्षणे असलेल्या वा पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांवरील उपचारासाठी महापालिकेचे वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात १३० खाटांची तर नेरुळ येथील तेरणा रुग्णालयात २५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन रुग्णालयांत परवडेल अशा दरांमध्ये उपचार घेण्याचा पर्याय रुग्णांपुढे आहे. मात्र महिनाभरापासून वाढत असलेल्या करोना रुग्ण संख्येमुळे या रुग्णालयांतील खाटा भरल्या असून अनेकांना खासगी कोविड रुग्णालयांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. सद्य:स्थितीत नवी मुंबईत डॉ. डी. वाय. पाटील, हिरानंदानी आणि कोपरखैरणे येथील रिलायन्स हॉस्पिटल हे तीन खासगी कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

या तीन रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी ३१० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या रुग्णालयांकडून करोना उपचारांसाठी अवाच्या सवा बिल आकारणी करण्यात येत आहे.  वाशीतील एका खासगी कोविड रुग्णालयात तर करोना उपचारासाठी रुग्ण दाखल होताच त्याच्यापुढे ७५ हजार रुपयांपासून दोन लाखांपर्यंत उपचाराचे पॅकेज समोर ठेवले जात असल्याच्या तक्रारी आहेत.

ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेने असे दरपत्रक जाहीर केले आहे. असे असताना या रुग्णांना एक लाखापेक्षा अधिक रकमेची बिलांची आकारणी होत असेल तर महापालिका त्यास जबाबदार आहे.

– विक्रम शिंदे, माजी आरोग्य समिती सभापती महापालिका

शासनाने ठरवून दिल्यानुसारच पैसे आकारण्याचे बंधन आहे. तसे जर होत नसेल तर पालिका आरोग्य विभागाला कळवावे. असे प्रकार नक्की कुठे घडत आहेत, हे समजल्याशिवाय कारवाई करणे शक्य नाही. नागरिकांनी पालिकेकडे ऑनलाइन तक्रार केल्यास कारवाई करू.

– बाळासाहेब सोनावणे, वैद्यकीय अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2020 4:46 am

Web Title: arbitrary charging from private covid hospitals in navi mumbai zws 70
Next Stories
1 ‘कोकणी माणूस शिवसेनेला धडा शिकवेल’
2 नवी मुंबई दुसऱ्या वर्षीही कचरामुक्त शहर
3 नियोजनाच्या अभावामुळे नवी मुंबईत रुग्णवाढ
Just Now!
X