१६ ते १९ डिसेंबर दरम्यान आयोजन
पुरातत्त्त्व विषयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये व लोकमानसात जागृती व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाचा ‘बहि:शाल शिक्षण विभाग’ आणि नव्याने स्थापन झालेले ‘पुरातत्त्व केंद्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या कलिना येथील संकुलामध्ये चार दिवसीय पुरातत्त्व व भूशास्त्र विषयासंबंधी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी पुरातत्व व भूशास्त्र या विषयांचे वेगवेगळ्या वेळेस प्रदर्शन भरवले जाते. परंतु, यंदा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी १६ ते १९ डिसेंबर दरम्यान एकत्रित चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात शोभिवंत दिसणारे खडक, खनिजे, जीवाश्म, पुरातत्वीय वस्तू, प्राचीन नाणी, मातीची भांडी, मूर्ती, हत्यारे अशा वस्तू पाहावयास मिळणार आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून बहि:शाल शिक्षण विभागाकडून हे प्रदर्शन भरवले जात आहे.
भारतीय पुरातत्व शास्त्राचे महर्षी प्रा. डॉ. हसमुखलाल सांकलीया यांच्या जन्मदिनी पुरातत्वदिन साजरा करण्यात येतो. विद्यार्थ्यांमध्ये या विषयाबाबत जागृती करण्यासाठी अशा दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले जात आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते होणार असून प्रदर्शनाच्या मांडणीसाठी पुण्याचे डेक्कन महाविद्यालय तसेच एम. एफ. मक्की, विक्रम राव आणि अनेक नाणी संग्राहकांचे सहकार्य मिळाले आहे.
प्रदर्शनाबरोबरच मातीच्या भांडय़ांचा इतिहास, वारली चित्रशैली आणि तिचे प्राचीनत्व, लुटुपुटीचे उत्खनन, ब्राम्ही-खरोष्ठी-मोडी या लिपींचे प्रात्यक्षिक तसेच प्रश्नमंजुषा, खजिन्याच्या शोधात अशा कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.