News Flash

शहरात प्राणी, वस्तुसंग्रहालय आणि पुस्तकालयाची गरज

नवी मुंबई पालिकेचा प्रारूप विकास आराखडा शुक्रवारी सर्वसाधारण सभेत सादर केला जाणार आहे.

प्रारूप विकास आराखडय़ाबाबत वास्तुविशारदांचे मत

सिडकोच्या जमिनीवर वसलेल्या नवी मुंबईत अनेक नागरी सेवांची आवश्यकता असून शहरात ‘बघण्यासारखे’ निर्माण करण्याची जबाबदारी भविष्यात पालिकेची राहणार आहे. सार्वजनिक सेवा-सुविधांसाठी पालिकेला भूखंड देण्यास मज्जाव करणाऱ्या सिडकोकडून शासनाच्या माध्यमातून अनेक भूखंड पदरात पाडून घ्यावे लागणार असून मुंबईतील प्राणी, वस्तुसंग्रहालयाप्रमाणेच भव्य पुस्तकालय उभारावे लागणार असल्याचे मत अनेक वास्तुविशारदांनी व्यक्त केले आहे.

नवी मुंबई पालिकेचा प्रारूप विकास आराखडा शुक्रवारी सर्वसाधारण सभेत सादर केला जाणार आहे. पालिकेने केलेल्या तरतुदी, आरक्षण, संकल्प या आराखडय़ात स्पष्ट होणार असून नगरसेवकांच्या सूचना-हरकतींनंतर तो जनतेसाठी खुला केला जाणार आहे. नवी मुंबई हे शहर सिडकोने वसविलेले असून अनेक सेवा सुविधांची कमतरता आहे. गेल्या ३० वर्षांत पालिकने या सेवा-सुविधा नागरिकांना देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी सिडकोकडून पाचशेपेक्षा जास्त भूखंड हस्तांतरित करून घेण्यात आले आहेत, तर काही भूखंडांसाठी पालिकेने कोटय़वधी रुपये मोजलेले आहेत. शिरवणे एमआयडीसीत नुकत्याच देण्यात आलेल्या पशुवैद्यकीय रुग्णालय आणि कत्तलखान्यासाठी पालिकेला १८ कोटी रुपये मोजावे लागले आहेत. अशाच प्रकारे अनेक सेवा-सुविधांची पूर्तता पालिकेला येत्या काळात करावी लागणार असून त्यासाठी विस्तीर्ण भूखंड लागणार आहेत.

राज्य शासनाच्या माध्यमातून अशा कामासाठी भूखंडावर आरक्षण टाकण्यास पालिकेला मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात सिडको आणि पालिकेत शह-काटशहचा वाद होणार आहे. सिडकोच्या काही प्रकल्पासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून परवानगी लागणार असून ही परवानगी देताना पालिका सिडकोची अडवणूक करण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सादर होणाऱ्या प्रारूप विकास आराखडय़ात२० वर्षांनंतर वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करण्यात आला आहे.

संक्रमण शिबीरांचा अभाव

शहरात एखादी आपत्कालीन घटना घडली तर मोठय़ा प्रमाणातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी संक्रमण शिबीर नाही. इमारतींच्या छतावर अनधिकृत बांधण्यात आलेले छप्पर आणि तेथे होणाऱ्या मेजवान्या यांवर पालिकेचे नियंत्रण नाही. मार्जिनल स्पेस हडप करणाऱ्या दुकानदारांची संख्या हजारोंनी आहे. २९ गावांचा या विकास आराखडय़ात विचारच करण्यात आलेला नाही. एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या झोपडपट्टीबाबतही असाच दृष्टिकोन आहे.

सिडकोने सार्वजनिक सेवा-सुविधांसाठी योग्य ठिकाणी भूखंड सोडलेले नाहीत. हे शहर सिंगापूर, दुबई यांसारख्या नव्याने विकसित झालेल्या देशाप्रमाणे वसविता येणे शक्य होते, पण ते झाले नाही.   – पी. एस. नाडकर्णी, वास्तुविशारद, वाशी

 

नवी मुंबईत येत्या काळात वस्तू तसेच प्राणिसंग्रहालय आवश्यक आहे. एशियाटिक दर्जाची एक चांगली लायब्ररी निर्माण होणे अपेक्षित आहे. आर्ट गॅलरी नाही. लाखोच्या जनसमुदाच्या सभा होतील अशी एकही जागा नवी मुंबईत नाही. – लीलाधर परब, वास्तुविशारद, वाशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 12:33 am

Web Title: architects opinion on draft development plan akp 94
Next Stories
1 प्रदूषणामुळे उरणचा श्वास गुदमरला
2 उरण पंचायत समिती सभापतिपद सर्वसाधारण जागेसाठी
3 कांदा दरात घसरण
Just Now!
X