पाच हजार रुपये खर्च करा, संतती होईल अशा भूलथापा मारणाऱ्या एका भोंदूबाबाला मुंबईतील चित्ता कॅम्प येथून कामोठे पोलिसांनी अटक केली आहे. या भोंदूबाबाने आपला विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेने केल्यानंतर त्याला विनयभंग व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. मेलवेल मन्नील्यम अर्जन ऊर्फ विरप्पन बाबा (रा. ट्रॉम्बे, चेंबूर) असे या आरोपीचे नाव आहे.

संबंधित महिलेला अपत्यप्राप्ती होत नसल्याने तिचे सासू-सासरे दोन वर्षांपूर्वी विरप्पनकडे घेऊन गेले होते. यानंतर हा भोंदूबाबा पीडित महिलेशी दूरध्वनीवरून संपर्क साधून शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करीत होता. यामुळे त्रस्त झालेल्या या महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या महिलेने सासू-सासऱ्यांविरोधातही जाच व छळ केल्याची तक्रार केली आहे. तिचे सासू-सासरे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.