पनवेल : रेमडेसिविर इंजेक्शनच्या नावाखाली सामान्यांची लूटमार करणाऱ्यांना पनवेल शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. इंजेक्शनही दिले नाही आणि ८८ हजार रुपये घेऊन फरार झालेल्या त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे येथील व्यक्तीला रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असल्याने त्यांनी समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या संदेशाद्वारे आकाश म्हात्रे याच्याशी संपर्क साधल्यावर त्याने सौरभ बोनकर याचा संपर्क क्रमांक दिला. सौरभने दर निश्चित केल्यानंतर अनिकेत तांडेल याच्याकडे रक्कम जमा करून इंजेक्शन मिळेल असे सांगितले. अनिकेतने इंजेक्शन देण्यासाठी व पैसे घेण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकात पीडितांना बोलावले. त्यानंतर लगेच ठिकाण बदली करून बामन डोंगरी रेल्वे स्थानकाबाहेर बोलावून ८८ हजार रुपये स्वीकारले, मात्र इंजेक्शन आणून देतो असे सांगून येथून फरार झाला. पीडितांनी पुन्हा अनिकेतशी संपर्क साधल्यावर त्यांना पोलिसांनी रोकड व इंजेक्शन जप्त केले असून पोलिसांत न जाण्याचा सल्ला दिला. अखेर पीडितांनी पोलिसांकडे धाव घेतल्यावर अनिकेत, आकाश व सौरभ या तिघांना मोबाइल व इतर तांत्रिक तपासाने शोध घेऊन अटक केली. या त्रिकुटाला न्यायालयाने ३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.