X

कुटुंब संकुल : स्वच्छतेचा वसा!

मुबलक पाणीपुरवठा होत असूनही येथील रहिवासी पाण्याचा काटकसरीने वापर करतात.

संतोष जाधव

माता वैष्णो सोसायटी, प्लॉट नं-१२, २१, सीवूड्स सेक्टर -४२

सीवूड्स सेक्टर ४२ येथील प्लॉट नंबर १२ व २१ येथील माता वैष्णो सोसायटीत विविध जातीधर्माचे रहिवासी राहतात. १९९२ मध्ये सोसायटीची नोंदणी झाली असून इथे दोन विंग आहेत. त्यात ११०६ आणि १३८५ चौरस फुटांच्या सदनिका आहेत. पार्किंगसाठी उत्तम व्यवस्था आहे. सोसायटीत स्वच्छतेवर भर दिला जातो. मुबलक पाणीपुरवठा होत असूनही येथील रहिवासी पाण्याचा काटकसरीने वापर करतात.

संपूर्ण नवी मुंबई पुन्हा एकदा स्वच्छता सर्वेक्षणामध्ये सहभागी होत असताना माता वैष्णो सोसायटीतील सदस्यांनीही आपली नवी मुंबई स्वच्छ नवी मुंबईची घोषणा देत आपल्या सोसायटीमध्ये स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. सर्व वयोगटांतील रहिवासी परिसर स्वच्छ राखण्यासाठी प्रयत्न करत असल्यामुळे सोसायटीचे आवार नेहमीच स्वच्छ आसते. ओला, सुका कचरा वेगळा गोळा केला जातो. सोसायटीतील उद्यानही कायम बहरलेले असते. सोसायटीत वेळच्यावेळी धूरफवारणी तसेच जंतुनाशकांची फवारणी करून रहिवाशांना रोगराईपासून दूर ठेवले जाते. आरोग्यमय जीवनाचे व सामाजिक बांधिलकीचे धडे येथील लहान मुलांना दिले जातात.

सोसायटीत सलोखा जपण्यासाठी गणेशोत्सव, होळी तसेच अन्य सण उत्साहात साजरे केले जातात. त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. त्यात सर्व सदस्य सहभागी होतात. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनही उत्साहात साजरे केले जातात.

संकुलाच्या पाण्याच्या टाक्यांमधून पाणी वाहून वाया जाऊ नये म्हणून योग्य उपाययोजना येथे करण्यात आल्या आहेत. सोसायटील सर्वच कामकाज पाहण्यासाठी एका जबाबदार व्यक्तीची नियुक्ती केली जाते. दैनंदिन आर्थिक व्यवहारांचे हिशेबही चोख ठेवले जातात. संकुलात चार उद्वाहने असून त्यांची वेळच्या वेळी देखभाल केली जाते. पर्यावरणाचे रक्षण व पाणीबचतीसाठी सोसायटी आग्रही असताना वीजबचतीसाठी सोसायटीमध्ये एलईडीचा वापर करण्यात आला आहे.

सोसायटीत अग्निशमन व्यवस्था असून तिची वेळेवर तपासणी केली जाते. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज आहे. सोसायटीमध्ये सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. चार स्वच्छता कर्मचारी नेमण्यात आले आहेत. स्वच्छ परिसर, बहरलेले उद्यान आणि सर्व अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त असलेल्या या संकुलाचे वातावरण नेहमीच प्रसन्न असते.

santoshnjadhav7@gmail