तुर्भे

बेलापूर गावानंतर ठाणे जिल्ह्य़ात सर्व परिचित असलेले गाव म्हणजे तुर्भे गाव. ठाणे आणि बेलापूरच्या मध्यावर असलेल्या या गावाची ओळख शैक्षणिक पंढरी म्हणूनच करून द्यावी अशी आहे. मुंबई, ठाण्याजवळ असूनही दुर्लक्षित, अडगळीत आणि मागासलेली गावे असलेल्या आजच्या नवी मुंबईत माध्यमिक शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करण्याचे काम या गावाने केलेले आहे. येथील डॉ. सामंत विद्यालय संपूर्ण ठाणे बेलापूर पट्टीसाठी वरदान ठरल्याने अनेक तरुणांनी याच विद्यालयाच्या माध्यमातून वाघिणीचे दूध ओळखल्या जाणाऱ्या इंग्रजीची ओळख करून घेतली. डॉ. विश्वनाथ सामंत आणि शांता महाजन अर्थात सर्वाची रामतणू माता या दोन ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांच्या परिस स्पर्शानी पावन झालेल्या या गावाचा नंतर आमूलाग्र कायापालट झाला. नवी मुंबईतील इतर गावांच्या तुलनेने आखीव रेखीव आणि सुनियोजित गाव म्हणून या गावाकडे पाहिले जात आहे. गावात पहिल्यांदा गावठाण विस्तार योजना राबवली गेल्याने रस्ते, दिवाबत्ती, पाणी, गटारे अशा नागरी पायाभूत सुविधांची आखणी गावात चांगल्या प्रकारे केली गेली आहे. त्यामुळेच या गावात आजही चारचाकी वाहनासह सहज फेरफटका मारता येतो.

Unseasonal weathe hail in Vidarbha Three districts of Marathwada are also affected by rain
विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
drowned
साताऱ्यातील शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू
Gadchiroli district is worst affected by wildfires
जागतिक वनदिन विशेष: वणव्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याची सर्वाधिक होरपळ 

नवी मुंबईतील २९ गावांमध्ये सर्वाधिक चर्चिल्या जात असलेल्या गावांत तुर्भे गावाचा उल्लेख केला जातो. सध्या या गावाच्या उत्तर बाजूस अशिया खंडातील सर्वात मोठय़ा अशा पाच घाऊक बाजारांची बाजारपेठ आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियातील एका रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर उभारण्यात आलेले तुर्भे रेल्वे स्थानक हे पर्यटनाच्या दृष्टीने एक आकर्षणाचा बिंदू आहे. साठ-सत्तर कुटुंबांचा विस्तार होऊन तुर्भे गावाची आजची ग्रामस्थ लोकसंख्या दीड हजाराच्या घरात गेली आहे. आजच्या मॅफको मार्केटपर्यंत या गावाची पश्चिम बाजूकडील हद्द मानली जात होती. अरबी समुद्राच्या खाडीचे पाणी या मॅफको मार्केटपर्यंत येत होते. त्यामुळे भरती ओहोटीच्या लाटांवर येणाऱ्या पाण्यापासून मीठ निर्माण करण्याचे मोठे काम या गावातील ग्रामस्थ करीत असत. पूर्व बाजूस विपुल वनसंपदा असल्याने रानमेवा आणि हिंस्र  श्वापदांचा चांगलाच वावर आजच्या फायझर, ल्युब्रिझॉल आणि बीएसएफ या कंपनीच्या क्षेत्रात होता. दक्षिण बाजूस सानपाडा, कुकशेत या गावांची लोकवस्ती दूरवर पसरली होती, तर उत्तर बाजूस कोपरी गावाची सीमा लागली होती मात्र गावाच्या चारही बाजूने मिठागरे, भातशेती आणि घनदाट जंगल अशी भौगोलिक रचना असलेल्या तुर्भे गावाच्या चारही बाजूने आता चांगलेच नागरीकरण व औद्योगिकीकरण फोफावले आहे. या गावात ठाण्याहून आलेल्या डॉ. विश्वनाथ सामंत यांनी पाऊल ठेवले आणि या गावाचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कायापालट झाला असा आजही गावातील ग्रामस्थांचा विश्वास आहे. रामतणू मातेच्या वास्तव्याने तर गावाचा आध्यात्मिक विकास झाला आहे. त्यामुळे गावात संस्कार आणि संस्कृती जोपासणाऱ्या ग्रामस्थांची एक परंपरा गावाला लाभली आहे. पाटील, घरत, म्हात्रे अशी आडनावे असलेल्या शतप्रतिशत आगरी समाजाच्या गावात एखाद दुसरे कोळी कुटुंब विस्तार झाल्याचे दिसून येते. वैती हे त्यापैकी एक कुटुंब. कामधंद्यानिमित्ताने आलेल्या या गावात अशी अनेक कुटुंबे नंतर गावाचा एक अविभाज्य भाग बनून राहिली. यात बारा बलुतेदारांचा आजही गावात तेवढाच रुबाब आहे, जेवढा या गावातील वतनदारांचा आहे. शेती आणि मिठागरावर मजुरी करणारे हे गाव पोटापाण्यापुरती मासेमारी करीत होते. त्यानंतर गावाच्या पूर्व बाजूस आलेली एमआयडीसी या गावाच्या प्रगतीसाठी पूरक ठरली. त्यामुळे ल्युब्रिझॉल, फायझर, बीएसएफ, रॅलीस यांसारख्या मल्टिनॅशनल कंपनीत तुर्भे गावातील ग्रामस्थांनी काम आणि छोटे-मोठे उद्योग करण्याची संधी मिळाली. त्यामुळे पंचक्रोशीतील श्रीमंत गाव अशी या गावाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

गावच्या श्रीमंतीचा एक किस्सा आजही ऐकविला जातो. माजी सरपंच रामकृष्ण पाटील यांच्या घराचा पाया खोदताना एक एक रुपये असलेला पाचशे रुपयांचा चांदीचा हंडा सापडला होता. त्यामुळे या गावाच्या श्रीमंतीचे काही दाखले आजही दिसून येतात. केंद्र सरकाराने स्वच्छ भारत अभियान मोठय़ा वेगाने राबविण्यास सुरुवात केली आहे. उघडय़ावर कोणी शौचास जाऊ नये यासाठी शौचालय बांधण्यास अनुदान दिले जात आहे. याच पाटील यांनी साठ वर्षांपूर्वीच आपल्या घरात शौचालयाची व्यवस्था केली होती. त्यामुळे बेलापूर पट्टीतील पहिले खासगी शौचालय या गावात होते. भांडणतंटय़ापासून चार हात लांब राहिलेल्या साध्या सरळ तुर्भेवासीयांच्या जीवनात रामतणू माता आणि डॉक्टर सामंत यांना अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. विशेष म्हणजे या दोन्ही असामी या गावच्या मूळ रहिवाशी नव्हत्या. या व्यक्तिमत्त्वांनी गावासाठी दिलेल्या योगदानाच्या ऋणात ग्रामस्थ आजही राहू इच्छितात. डॉ. सामंत यांच्या वडिलांनी स्वातंत्र्यपूर्व काळात या गावाशेजारी थोडी जमीन खरेदी केली.

त्यामुळे ठाण्यावरून या कुटुंबाचे गावात येणे-जाणे सुरू झाले. त्यातूनच गावात १९५२ मध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यामुळेच आजूबाजूच्या गावातील तरुण या शाळेत उच्चशिक्षण घेऊ शकले. वाशी, बेलपाडा येथील विद्यार्थी खाडी पार करून या शाळेत शिकायला येत होते. काही जण नातेवाईकांकडे राहून  शिक्षण घेत होते तर काही जण मैलोन्मैल पायपीट करून शिक्षणाची गोडी सांभाळत होते. त्यामुळे नवी मुंबईत आज जुन्या काळात शिकलेले काही डॉक्टर, वकील आहेत ते केवळ सामंत विद्यालयामुळे असे अभिमानाने सांगितले जाते. सामंत विद्यालयानंतर घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालय सुरू झाले. विशेष म्हणजे या शाळेची उभी राहिलेली पहिली इमारत ही गावाच्या श्रमदानाने उभी राहिलेली आहे. डॉ. सामंत यांच्याच प्रयत्नाने गावातून जाणारे रस्ते श्रमदानाने बांधले. शिकेल तो टिकेल हे तत्त्व डॉक्टरांनी संपूर्ण गावाला दिले. नवे शहर उभे करणाऱ्या सिडकोला विरोध करू नका, त्यातून स्वत:चा विकास साध्य करा असा सल्ला त्या वेळी डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे बेलापूर पट्टय़ातील पहिली गावठाण विस्तार योजना सिडको या गावात राबवू शकली होती. तुर्भेप्रमाणेच संपूर्ण गावात अशा प्रकारच्या गावठाण विस्तार योजना राबविल्या गेल्या असत्या तर या शहरात बेकायेदशीर बांधकामांचा भस्मासूर उभा राहिला नसता, असे ग्रामस्थ सांगतात. रामतणू माता तर गावाला मिळालेले वरदान आहे. बालविवाहामुळे पतीचा मृत्यू उघडय़ा डोळ्याने पाहिल्यानंतर मुखी रामनाम जपत रामतणू माता कोकणातून तुर्भे गावात आपल्या आत्तेकडे आल्या. सद्गुरू बाळकृष्ण महाराजांचा त्यांना अनुग्रह झाला आणि रामावरील श्रद्धा दृढ झाली. त्यामुळे गावात पंचक्रोशीतील पहिल्या महिला भजनाची नीव रोवली गेली. रामनामाचा जप हेच जीवन असल्याचा मंत्र माता रामतणू यांनी गावाला दिला. त्यामुळेच गावात होणारा रामनवमी उत्सव लक्षवेधी आणि परंपरा सांभाळणारा आहे.  याशिवाय चैत्र द्वादशीला होणारी गावची जत्रा, हनुमान जयंती हे  उत्सव होतात. तुर्भे झोपडपट्टी असलेली सारमाई मातेचे मंदिर हे गावाच्या अस्मितेचा एक भाग आहे. तर फायझर कंपनीच्या क्षेत्रात असलेले शेततळे कमळांसाठी प्रसिद्ध होते. जयसिंग डायकेम जवळील गणोबा मंदिर हे गावाचे श्रद्धास्थान आहे. गावाचा गणपती घोडय़ावरचा आहे अशी श्रद्धा असल्याामुळे ग्रामस्थ लग्नात घोडय़ाचा वापर करीत नाहीत. या गावात सर्वत्र टोलेजंग इमारती उभ्या राहतील हे रामतणू मातेचे शंभर वर्षांपूर्वीचे भाकीत खरे ठरले आणि नवी मुंबई शहर जागतिक पातळीवर अधोरेखित झाले.