उद्योजक : योगेश तेलवणे

आपल्या घरापर्यंत वीज पोहचते, ती रोहित्रांच्या माध्यमातून. या क्षेत्रात सिमेन्स, भारत बिजलीसारखे अनेक बडे कारखाने कार्यरत आहेत. यातील आणखी एक विश्वासार्ह म्हणजे ‘तेलवणे ट्रान्सफॉर्मर’. रबाळे व तळोजा येथे तीन कारखाने असलेली ही कंपनी आज देश-विदेशांत सेवा देत आहे. रोहित्राच्या उद्योगात आपला ठसा उमटविणारे सुधाकर तेलवणे यांची दुसरी पिढी आता हा उद्योग पुढे नेत आहे. टाटा पॉवर, राज्य विद्युत वितरण विभाग, रिलायन्स, त्रिपुरा स्टेट इलेक्ट्रिसिटी, कर्नाटक पॉवर, साऊथ सेंट्रल रेल्वेसारख्या बडय़ा कंपन्या तेलवणे यांची सेवा घेत आहेत.

तेलवणे क्रॉमटेक या कंपनीची धुरा सध्या सुधाकर तेलवणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव योगेश तेलवणे सांभाळत आहेत. त्यांचे दुसरे चिरंजीव राकेश तेलवणे हे उत्पादनाकडे लक्ष देतात. दोन भावांनी सेवा आणि उत्पादन याकडे स्वतंत्रपणे लक्ष देऊन तेलवणे यांचा ब्रॅन्ड देशविदेशात प्रस्थापित करण्याचा चंग बांधला आहे.

उद्योगाची कोणतीही पाश्र्वभूमी नसलेल्या सुधाकर तेलवणे यांचा जन्म मुरबाड तालुक्यात झाला. वडील पांडुरंग तेलवणे पेशाने शिक्षक. मुरबाडसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक मैल घोडय़ावरून प्रवास करून पांडुरंग तेलवणे झाडाखाली अध्यापन करत. आठ मुलांचा सांभाळ करण्यासाठी तेलवणे यांनी मुरबाड सोडले आणि भिवंडीसारखी बाजारपेठ गाठली. शिवणकामाचा व्यवसाय सुरू करून मुलांना चांगले शिक्षण दिले. त्यात सुधाकर तेलवणे यांना शिक्षणाची आवड होती. त्यांनी पुण्यातील एस. पी. महाविद्यालयात १९६९ मध्ये मॅकेनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. त्याच वेळी इलेक्ट्रिक इंजिनीअरिंगचेही ज्ञान मिळवले. त्यावेळी अशा विद्यार्थ्यांना तात्काळ नोकऱ्या मिळत. तेलवणे यांनाही काही दिवसांतच कांजुरमार्ग येथील क्रॉम्प्टन अ‍ॅण्ड ग्रीव्ह्जमध्ये नोकरी मिळाली. तिथे त्यांनी १७ वर्षे डिझाइन, क्वालिटी, वितरण, बाइंडिंग या उद्योगासाठी आवश्यक असलेल्या सर्व विभागांचे कौशल्य आत्मसात केले.

नोकरी करतानाच उद्योजक होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तेलवणे यांनी दोन पैसे गाठीशी बांधण्यासाठी १९८१ पासूनच आयुर्विमा एजंट म्हणून अर्धवेळ नोकरी केली आणि उद्योगासाठी भांडवल जमवले.

पैशांची तरतूद झाल्यानंतर त्यांनी १९८७ मध्ये क्रॉम्प्टन अ‍ॅण्ड ग्रीव्ह्जमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली. रबाळे येथील आर ३२५ मध्ये स्वत:चा उद्योग सुरू केला. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तेलवणे यांनी दिवसरात्र एक केले. कंपनीचा विकास करण्यात ते गुंतले होते. त्यासाठी ते रोज भिवंडी ते रबाळे प्रवास दुचाकीवरून करत. ८०० चौरस फूट क्षेत्रफळात सुरू करण्यात आलेल्या या कंपनीला तेलवणे यांनी नावारूपाला आणले. याच कारखान्यातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या अनेक कामगारांनी नंतर स्वत:चे कारखाने उभारले.

आपल्याकडे असलेले ज्ञान ते सतत सहकाऱ्यांना देत राहिले. दक्षिण अफ्रिका, बांगलादेश आणि काही आखाती देशांतही तेलवणे यांचे रोहित्रांची निर्यात केली आहे. गेल्या ३० वर्षांत या कंपनीने तयार केलेली आठ हजार रोहित्रे देश-विदेशात विकली गेली आहेत. तेलवणे यांचे उत्पादन आणि सेवा देशातील टाटा पॉवर, विद्युत वितरण कंपनी, रिलायन्स, एमपी, पॉवर ट्रान्समिशन, त्रिपुरा स्टेट इलेक्ट्रिक, कर्नाटका पॉवर, बीएआरसी, मुकुंद, हिंदुस्थान कॉपर या बडय़ा कंपन्यातील ट्रान्सफॉर्मरची काळजी घेण्याची काम तेलवणे यांची क्रॉमटेक कंपनी करीत आहे. क्रॉम्पट कंपनीत केलेल्या सेवेची ओळख म्हणून तेलवणे यांनी आपल्या कंपनीच्या नावात क्रॉम ठेवले आहे.

तेलवणे यांच्या तीन कंपन्या नवी मुंबई तळोजा परिसरात आहेत. २०० पेक्षा जास्त कामगार तिथे कार्यरत आहेत. कंपनीच्या एकत्रित वार्षिक उलाढालीचा आकडा १०० कोटींच्या पुढे गेला आहे. सात वर्षांपूर्वी सुधाकर तेलवणे यांचे निधन झाले, पण त्यांनी या जगात तेलवणे कुटुंबाचे नाव मात्र रोशन केले.

ट्रान्सफॉर्मर हेल्थ चेकअप

उत्पादनाबरोबर सेवेला महत्त्व देणारे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव योगेश तेलवणे यांनी ‘ट्रान्सफार्म हेल्थ चेक अप’ ही एक नवीन संकल्पना देशात रुजवली आहे. एका रोहित्रात बिघाड झाल्यास कोटय़वधी रुपयांचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी रोहित्रांची नियमित तपासणी करणे आवश्यक असते, हे योगेश तेलवणे सध्या देशातील अग्रगण्य कंपन्यांना पटवून देत आहेत.