हनुमान कोळीवाडा, उरण

उरण येथे देशातील सर्वात मोठे बंदर उभारण्यासाठी समुद्राला लागून असलेल्या न्हावा-शेवा गावांलगतच्या शेवा-कोळीवाडा या २५० लोकवस्तीच्या गावाते ३४ वर्षांपूर्वी स्थलांतर करण्यात आले. राज्य सरकारने बोरी पाखाडी भागात दोन एकरांवर या गावाचे पुनर्वसन केले खरे पण, या नव्या जागेतील ११ घरांना वाळवी लागली. ती घरे अक्षरश: जमीनदोस्त झाली. त्यानंतर वाळवीग्रस्त गाव म्हणून हे गाव ओळखले जाऊ लागले. देश-विदेशातील माध्यमांनी या गावाला भेटी दिल्या आहेत. वाळवीग्रस्त गावाचे म्हणजेच हनुमान कोळीवाडय़ातील ग्रामस्थांचे दुसऱ्यांदा पुनर्वसन करण्यात येणार आहे. एकाच गावाचे ३५ वर्षांत दोनदा स्थलांतर होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. समुद्राची गाज ऐकतच या गावाच्या १५ पिढय़ा मोठय़ा झाल्या आहेत. राज्याची राजधानी मुंबई या गावापासून सागरी मार्गाने ४५ मिनिटांवर असल्याने या गावाची मुंबईशी जवळीक आहे.

घारापुरीच्या पूर्वेस असलेले २५६ लोकवस्तीचे शेवा कोळीवाडा गाव केंद्र सरकारच्या नियोजित जेएनपीटीला अडथळा ठरू पाहात होते. त्या वेळी भूसंपादन आतासारखे सोपे नव्हते. सरकारला जमीन हवी असल्यास ती बळाचा वापर करून संपादित केली जात होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्र आरमारात या गावाचा दाखला आहे तर ब्रिटिशांनी या गावाची दखल आपल्या दरबारात घेतली होती. अशा ऐतिहासिक व समुद्राशी अतूट नाते असलेल्या शेवा कोळीवाडय़ातील २५० ग्रामस्थांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. समुद्राला लागून असलेली न्हावा-शेवा गावांची जमीन जेएनपीटी बंदरासाठी अनुकूल होती, त्यामुळे ही जमीन आंतरराष्ट्रीय बंदरासाठी निश्चित करण्यात आली. समुद्राजवळच नवीन गाव हवे ही ग्रामस्थांची मागणी मान्य करण्यात आली.

उरण भागातीलच बोरी पाखाडी येथील सव्वासहा हेक्टर जमीन त्यासाठी निश्चित करण्यात आली आणि १९८३ नंतर टप्प्याटप्प्याने ग्रामस्थांनी आपले निर्सगसंपन्न गाव सोडले. या गावच्या तीनही बाजूने पाणी आहे. पूर्वेला अथांग समुद्र, उत्तरेला आमराई आणि दक्षिण व पश्चिमेला डोंगर असलेला शेवा कोळीवाडा गाव ग्रामस्थांना देशाच्या बंदर विकासासाठी सोडावे लागले. त्या वेळी अनेक ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आले. गावाचे गावपण जात असल्याचे अतीव दु:ख या ग्रामस्थांनी त्या वेळी सोसले.

एखाद्या निसर्गचित्रासारख्या या गावातील ग्रामस्थ मासेमारी, मिठागर, शेती, भाजी आणि गवतविक्रीत समाधानी होते. येथील मासळी मुंबईत प्रसिद्ध होती. याच शेवा कोळीवाडय़ाच्या जागेवर आता हजारो टन वजनाचे देशी-विदेशी कंटेनर उतरतात. गावाच्या पाऊलखुणा त्या कंटेनरच्या ओझ्याखाली नष्ट झाल्या आहेत. ग्रामस्थांनी नवीन बोरी पाखाडी येथील कोळीवाडय़ात स्थलांतर केले. या जागेत पहिल्यापासून हनुमानाचे जागृत मंदिर आहे. त्यामुळे नवीन गावाचे नाव हनुमान कोळीवाडा असे ठेवण्यात आले. तशी नोंद सरकारदरबारी आहे.

हनुमानचे दैवत- श्रीरामाच्या मंदिराचीही नंतर ग्रामस्थांनी उभारणी केली. त्यामुळे गावात राम हनुमानाचा जप घरोघरी ऐकू येतो. त्यामुळे हे गाव बऱ्याच अंशी शाकाहारी आहे. गावात या दोन आराध्य दैवतांच्या जयंत्या मोठय़ा धुमधडाक्यात साजऱ्या केल्या जातात. गावात आता अनेक पक्षांचे झेंडे फडकत असल्याचे दिसतात. पण या दोन उत्सवांत सर्व ग्रामस्थ सहभागी होतात.

जेएनपीटीसाठी त्याग केलेल्या गावावर पुन्हा स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. या शेवा कोळीवाडय़ाच्या पुनर्वसनाची जबाबदारी राज्य शासनाची होती. हे पुनर्वसन करताना जमिनीचा पोत, आजूबाजूची नैसर्गिक स्थिती, यांचा अभ्यास करून या गावाचे पुनर्वसन होणे आवश्यक होते. १९८३ नंतर शेवा कोळीवाडा गाव बोरी पाखाडी येथे स्थलांतरित झाल्यानंतर या जमिनीच्या खाली असलेल्या पांढऱ्या वाळवीने लाकूड पाहताच ते पोखरण्यास सुरुवात केली.

शेवा येथील गावात ग्रामस्थांनी आपल्या परांपरागत घरांसाठी जुन्या सागाच्या लाकडांचा खूप मोठय़ा प्रमाणात वापर केला होता. त्यातील काही लाकूड ग्रामस्थांनी नवीन गावातील घरांच्या उभारणीसाठी वापरले होते. मात्र वाळवीने गेल्या १६ वर्षांत हनुमान कोळीवाडय़ातील घरे पोखरून जर्जर केली. तुकाराम कोळी यांचे घर कोसळल्यानंतर हा वाळवीचा प्रताप सर्व ग्रामस्थांच्या लक्षात आला आणि त्यांनतर त्यांची ११ घरे जमीनदोस्त झाली.

पुढे लाकडांची जागा सिमेंट क्राँक्रीटने घेतली. त्यामुळे गेली सहा-सात वर्षे ग्रामस्थ वाळवीच्या त्रासापासून दूर आहेत. पण वाळवी आजही भूर्गभात पोखरण्याचे काम करत असल्याचा अहवाल असल्याने या गावाचे पुन्हा स्थलांतर करण्याशिवाय पर्याय नाही. जुन्या गावाची लोकसंख्या २५० होती ती आता दोन हजारांच्या घरात गेली आहे. नवीन गावाच्या तीन बाजूंनी खाडी आहे तर पश्चिमेला उरण मोरा मार्ग आहे. राज्य शासनाने ग्रामस्थांचे योग्य ते पुनर्वसन केलेले नाही. आगीतून निघून फुफाटय़ात पडल्यासारखी ग्रामस्थांची अवस्था झाली आहे.

स्थलांतरापासून सुरू झालेली अस्थिरता संपतच नसल्याची व्यथा येथील ग्रामस्थ व्यक्त करतात. सर्व सामानासह शेवा गाव सोडण्याचा दिवस मन हेलावून सोडणारा होता.

गावातील आत्ताची पिढी मुंबई जवळ असल्याने चांगले शिक्षण घेत आहे. दत्ता कोळी हे गावातील पहिले पदवीधर ठरले. कमलाकर कोळी हे मुंबई उच्च न्यायालयात डेप्युटी रजिस्ट्रार होते. शिक्षणाच्या जोरावर येथील रहिवासी स्वावलंबी झाले आहेत, प्रगती करत आहेत, मात्र वाळवीची भीती आजही त्यांना पोखरत आहे. पुन्हा पुनर्वसन कधी होणार या प्रतीक्षेत हे गाव आहे.

नियोजनबद्ध विकासाची मागणी

पुनर्वसनामुळे गावाचा काही प्रमाणात विकास झाला, पण हा विकास शासनाने दिलेल्या सव्वासहा हेक्टर जमिनीवर होणे आवश्यक होते. त्याऐवजी केवळ दोन एकरांवर गाव वसवण्यात आल्यामुळे घरे दाटीवाटीने उभारली गेली. शेजारी असलेल्या सव्वाचार हेक्टर जमिनीवर शासनाने नव्याने व नियोजनबद्ध पुनर्वसन करावे ही ग्रामस्थांची मागणी आजही कायम असल्याचे यशवंत कोळी सांगतात.