ब्रिटिश काळात पनवेल तालुक्यातील सर्वात मोठे महसुली गाव म्हणून या गावाचे नाव कामोठे पडले असावे असे सांगितले जाते. त्याला कागदोपत्री पुरावा नाही. चारही बाजूंना नजर पोहोचेल तिथवर विस्र्तीण शेतजमीन आणि घनदाट झाडीने हे गाव वेढलेले होते. गावाच्या पश्चिम बाजूला खाडीचे पात्र होते. विस्र्तीण अशा शेतजमिनीवर कोलम तांदूळ मोठय़ा प्रमाणात पिकवला जात असे. कोलम तांदळाचे आगार अशीही या गावाची एक वेगळी ओळख आहे. आत्ताच्या शीव-पनवेल महामार्गापर्यंत आंबा, जांभूळ, आणि करवंदांचे जंगल पसरले होते.

आजचे कामोठे गाव सिडकोनिर्मित ३८ सेक्टर्सनी वेढलेले आहे. त्यामुळे गाव शोधताना दमछाकच होते. आगरी आणि कऱ्हाडी जातीचा प्रभाव असलेल्या या गावाची स्वातंत्र्यपूर्वकाळातील लोकसंख्या आठशे ते नऊशे इतकी होती. गावात दोनशे कुटुंब त्या वेळी गुण्यागोविंदाने राहत होते. इतकी लोकसंख्या असलेले हे एकमेव गाव होते.

स्वातंत्र्योत्तर काळात या गावाच्या पूर्वेस काँग्रेस सरकारने काही उद्योजकांसाठी पंडित जवारलाल नेहरू इंड्रस्टियल इस्टेट स्थापन केली. (मुंबई-पुणे एक्स्प्रेस संपल्यानंतर डाव्या बाजूला ही वसाहत आहे.) त्यासाठी सरकारने येथील गुरचरण जमीन संपादित केली आणि उद्योजकांना दिली. त्यामुळे गोधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. गुरचरण जमीन गेल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तहसीलवर एक भव्य मोर्चा नेला. त्या वेळी मोर्चासाठी कामोठेपासून पनवेलपर्यंत बैलगाडय़ांची रांग लागली होती. या आंदोलनामुळे तात्कालीन काँग्रेस सरकार हादरले. या गुरचरण जमिनीच्या बदल्यात सरकारने साडेसात एकर जमीन नंतर ग्रामस्थांना दिली. त्यातील काही जमीन ग्रामस्थांनीच नंतर परस्पर विकून टाकली मात्र गावची जमीन हातची जात असल्याचे बघून स्वामी म्हात्रे, विठुशेठ गोवारी, सावलाराम गोवारी, शंकरशेठ म्हात्रे आणि आबाजी म्हात्रे या ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावाशेजारी एक अद्ययावत शाळा बांधण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गावकीच्या साडेसात एकर जमिनीपैकी तीन एकर जमिनीवर न्यू इंग्लिश स्कूल, कामोठे उभी राहिली. अद्ययावत शिक्षण पद्धत स्वीकारणाऱ्या या शाळेची पटसंख्या वाढत असल्याचे स्वामी म्हात्रे यांनी सांगितले. ग्रामस्थांनी ग्रामस्थांच्या मुलांसाठी बांधलेली ही शाळा गावाच्या अभिमानाचा विषय आहे.

सिडकोने फसवणूक केल्याची सल आजही ग्रामस्थांच्या मनात घर करून आहे. बाजूच्या नावडे गावात आणि शीव-पनवेल महामार्ग पार करून कळंबोलीत जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागल्याने शाळेसारखे विधायक कार्य कामोठे ग्रामस्थाच्या वतीन घडले आहे. या गावाची सिडकोने सहाशे ते सातेश एकर जमीन संपादित केली आहे. त्याबदल्यात ग्रामस्थांना साडेबारा टक्के योजने अंतर्गत भूखंडदेखील मिळाले पण नवी मुंबईत सुरू झालेली या भूखंडांची खरेदी विक्री पाहून येथील ग्रामस्थांनी अत्यंत कमी दरात येथील भूखंड विकासकांना विकले. वाशी ते पनवेल रेल्वे मार्ग आणि खारघर नोडचा विकास झाल्यानंतर कामोठे नोडच्या विकासाला एकदम गती आली. त्या विकासाचा फायदा ग्रामस्थांनी घेण्याचे ठरविले. केवळ मूठभर ग्रामस्थांचे चांगभले होण्याऐवजी संपूर्ण गावाचे हित या विकासात दडले असल्याची बाब काही ग्रामस्थांनी सर्व गावकऱ्यांच्या लक्षात आणून दिली. कामोठे गावाजवळून जाणाऱ्या रेल्वे कंत्राटदाराला सर्वप्रथम ग्रामस्थांनी धारेवर धरले. त्यासाठी गावातील प्रत्येक बेरोजगार तरुणांच्या सहकारी सोसायटय़ा स्थापन करण्यात आल्या. कामोठे गावाच्या जमिनींवर विकास अथवा कोणत्याही प्रकारची स्थापत्य कामे करणाऱ्या कंत्राटदार विकासकांनी ग्रामस्थ मंडळाला प्रकल्पाच्या १० टक्के रक्कम धनादेशाद्वारे द्यावी, अशी अट घालण्यात आली. ५० ग्रामस्थांची एक सोसायटी अशा १६ सोसायटय़ा स्थापन करण्यात आल्या. त्यामुळे गावातील प्रत्येक घरातील तरुणांना व्यवसायाच्या संधी मिळाल्या. त्या प्रकल्पासाठी वाळू, विटा, खडी पुरवठय़ाची कामेदेखील गावीतील तरुणांनाच देण्याची अट घालण्यात आली. त्यामुळे गावातील किंवा गावाबाहेरील व्यक्तींची मक्तेदारी संपुष्टात आली. गावातील प्रत्येक तरुणाचा विकास झाला. काही गरीब ग्रामस्थांनी आपल्या मुलांची लग्ने तर काहींनी घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण केले. गावातील काही मूठभर लोकांना हा लाभ हवा होता. त्यावर ग्रामस्थांनी एकोप्याने पाणी फेरले आणि अभेद्य एकजुटीचे दर्शन संपूर्ण राज्यात घडविले. ग्रामस्थांनी व्यवसायांतून उभा केलेला दोन कोटींचा निधी दि. बा. पाटील यांना कृतज्ञता निधी म्हणून दिला. दि. बां. मुळे ग्रामस्थांचा विकास झाला असे ग्रामस्थ आजही मानतात. दिबांच्या पनवेल येथील संग्राम बंगल्याच्या कामासाठी याच गावातील अनेक ग्रामस्थांनी श्रमदान केले.

ब्रिटिश काळात असलेल्या शिक्षण बोर्डात गावचे पहिले सरपंच जगन्नाथ चांगोजी म्हात्रे यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या पुढाकारानेच गावात पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरू झाली. राजकीयदृष्टय़ा तसे हे गाव शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाते, पण गेल्या २० वर्षांत झालेल्या राजकीय स्थित्यंतरांमुळे आता या गावात प्रत्येक पक्षाचा एक तरी कार्यकर्ता आढळून येतो.

जत्रा आणि उत्सव

गावात हनुमान, शंकर, जरीमरी, गावदेवी आणि चेरोबाचे मंदिर आहे. या मंदिरांचाही विकासनिधीतून जीर्णोद्वार करण्यात आला आहे. हनुमान जयंतीचा उत्सव हा गावाचा एक सोहळा झाला आहे. पहाटे हनुमान जन्मापासून ते रात्री उशिरापर्यंत पालखी सोहळयाच्या कार्यक्रमात गावातील प्रत्येक नागरिक हिरिरीने भाग घेतो. हा उत्सव झाल्यानंतर चैत्र वैद्य त्रयोदशीला गावाची जत्रा मोठय़ा धुमधडाक्यात साजरी केली जाते. सांस्कृतिक परंपरा असलेल्या या गावातील जय हनुमान नाटय़ मंडळाच्या वतीने अनेक नाटके दाखविली गेली आहेत. भारुड, भजन परंपरा या गावाने काल-परवापर्यंत जपली होती. याच परंपरेमुळे गणेशोत्सव काळात आजही गावातील सर्व गणपती विसर्जनासाठी एका रांगेत एकाच वेळी येतात. सर्व गावकरी आपापली गणेशमूर्ती घेऊन टाळ-मृदंग आणि भजनांच्या तालावर तलावाकडे जातात, असे येथील ग्रामस्थ अभिमानाने सांगतात.

समाजेवेचा वसा

याचे वैशिष्टय़ म्हणजे महाराष्ट्राचे स्वच्छतादूत संत गाडेगेबाबा यांनी या गावात त्या वेळी साफसफाई करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले होते. या गावातील शाळेचे शिक्षक हिरवे गुरुजींनी गोवा मुक्तिसंग्रामात भाग घेतला आणि ते त्यात हुतात्मा झाले. त्यामुळे हिरवे गुरुजींचे गाव म्हणूनही हे गाव ओळखले जाते. प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते माजी खासदार दि. बा. पाटील या गावाला आपली कर्मभूमी मानत.