18 January 2021

News Flash

भाजपमध्ये मनोमिलनाची संक्रात?

पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाईक, म्हात्रेंमध्ये गोडव्याचे प्रयत्न

पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाईक, म्हात्रेंमध्ये गोडव्याचे प्रयत्न

नवी मुंबई : नवी मुंबईत भाजपचे तीन आमदार असताना त्यांच्यात एकवाक्यता नसल्याने पालिका निवडणूक जिंकण्याची खात्री पक्षाला नाही. त्यामुळे या आमदारांचे मनोमिलन होणे आवश्यक असल्याने आमदार व निवडणूक प्रभारी आशीष शेलार यांनी बुधवारी या तीन आमदारांच्या घरी व कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. गुरुवारच्या मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर सर्व मतभेद विसरून कामाला लागण्याचा सल्ला शेलार यांनी या तिन्ही आमदारांना दिला आहे.

भाजपत कोणतेही मतभेद अथवा मनभेद नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त करताना हे मतभेद महाविकास आघाडीत असल्याचा त्यांनी टोला लगावला.

नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर या दोन मतदारसंघांत भाजपचे आमदार मोठय़ा मताधिक्याने निवडून आलेले आहेत. त्यामुळे पालिकेत या पक्षाची सहज सत्ता येईल असे चित्र दिसून येते. मात्र या पक्षाच्या या दोन आमदारांमध्ये विस्तव जात नाही, हे जगजाहीर आहे.

राष्ट्रवादी पक्षात असताना बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या ज्येष्ठ चिरंजीवाला न देण्यात आलेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या काटशहापासून हे राजकीय वैमनस्य सुरू झालेले आहे ते आजतागयत कायम असून, म्हात्रे यांनी अनेक वेळा नाईक यांना जाहीरपणे शिव्यांची लाखोली वाहिलेली आहे. राष्ट्रवादीतील नाईकांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून म्हात्रे यांनी २०१४ मध्ये भाजपत प्रवेश केला. दोन वेगवेगळ्या पक्षांत असताना त्यांच्यात शह- काटशह सुरू असताना नाईक यांनी एक वर्षांपूर्वी भाजपत प्रवेश करून म्हात्रे यांची पंचाईत केली.  एकाच पक्षात राहूनही नाईकांचे आणि आपले कधी पटणार नाही असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. नाईक यांना बेलापूरसाठी नव्हे तर ठाणे जिल्ह्य़ातील नेता म्हणून भाजपने स्वीकारले आहे, अशी कानउघाडणी त्यावेळी म्हात्रे यांची पक्षश्रेष्ठींनी केली होती. या दोन आमदारांमधील मतभेदामुळे पालिका निवडणूक एकहाती सत्ता येणे कठीण जाणार असल्याचे भाजपा पक्षप्रमुखांना ज्ञात झाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मतभेद मिटविण्याअगोदर स्थानिक नेत्यांचे मनभेद दूर करण्याचे पहिले काम प्रभारी आमदार आशीष शेलार यांनी बुधवारी पार पाडले. त्यासाठी भाजपमध्ये ज्येष्ठ झालेल्या म्हात्रे यांच्या घरी त्यांनी पहिली हजेरी लावली. त्यावेळी म्हात्रे सर्मथक माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी शेलार यांचे स्वागत केले. २०१५ मध्ये देश व राज्यात मोदी लाट असताना म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली १११ नगरसेवकांपैकी भाजपाचे केवळ सहा नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी काही नगरसेवकांनी शेलार यांची भेट घेतली.

बेलापूरहून निघालेल्या शेलार यांनी नंतर खैरणे एमआयडीसीत असलेल्या नाईक यांच्या कार्यालयात जात त्यांची भेट घेतली. या दोन्ही भेटी या वैयक्तिक घेऊन दोन आमदारांमधील मतभेदाचे कारण व पालिका निवडणुकीतील तयारीचा आढावा शेलार यांनी घेतला.

त्यानंतर मात्र त्यांचा मोर्चा कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांच्या तळवली येथील घरी वळविला. पाटील यांनी आपल्या कोळी महासंघाचा भाजपला गेली सात वर्षे पाठिंबा दिला असून त्या बदल्यात पक्षाने त्यांना विधान परिषद दिलेली आहे.

मूळ नवी मुंबईकर असलेल्या पाटील यांनी राज्यातील कोळी समाजाची मोट बांधताना महामुंबईतील कोळी समाजाला एकत्र आणण्याचे काम केले आहे. त्यामुळे या पालिका निवडणुकीत त्यांची मदत पक्षाला महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठी पाटील यांच्या निवासस्थानी शेलार यांनी निवडणुकीची संपूर्ण चर्चा केली. यानंतर संध्याकाळी शहरातील पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर शेलार यांनी शिरवणे येथील एका शाळेत चर्चा केली असून पुढील रणनीती करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर भाजपने या निवडणुकीचे बिगूल वाजवले असल्याचे दिसून येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 1:27 am

Web Title: ashish shelar meets three navi mumbai mla ahead of municipal election zws 70
Next Stories
1 भाजपला आणखी एक धक्का बसणार
2 १८ कावळे दोन कबुतरे मृत आढळल्याने खळबळ
3 आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद
Just Now!
X