21 March 2019

News Flash

आश्रमशाळेतील अत्याचारप्रकरणी दोन आरोपींना कोठडी

 कळंबोली येथील ज्ञान आश्रमात ही मुले राहातात. त्यांच्या आई-वडिलांचा दादर येथे फूलविक्रीचा व्यवसाय आहे.

कळंबोली सेक्टर १४ मधील ज्ञान आश्रमात तीन मुलांवर अत्याचार केल्याप्रकरणी आश्रमातील दोन कर्मचाऱ्यांना कळंबोली पोलिसांनी अटक केली असून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. तीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप मुलांच्या वडिलांनी केला असला, तरी प्रत्यक्षात एका मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे.

कळंबोली येथील ज्ञान आश्रमात ही मुले राहातात. त्यांच्या आई-वडिलांचा दादर येथे फूलविक्रीचा व्यवसाय आहे. आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने तिन्ही मुलांना त्यांनी ज्ञान आश्रमात ठेवले होते. ही मुले १८, १२ आणि ११ वर्षांची असून सर्वात मोठा मुलगा मतिमंद आहे. त्याच्यावरच लैंगिंक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे.

गेले तीन महिने मुलांवर अत्याचार करण्यात येत होते, असे त्यांच्या वडिलांचे म्हणणे आहे. मुले सुट्टीत आई-वडिलांच्या घरी नालासोपारा येथे गेली असता त्यांनी आश्रमात पुन्हा जाण्यास नकार दिला. आई-वडिलांनी वारंवार कारण विचारल्यानंतर त्यांनी आश्रमातील दीपेश निकम (१९), गौरव कामत (२७) आणि लॉरेन्स (१८) हे लैंगिक अत्याचार करत असल्याचे सांगितले. मुलांचे म्हणणे ऐकून आई-वडिलांनी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

कळंबोली पोलिसांनी दीपेश, निकम व गौरव कामत यांना ताब्यात घेतले आहे, तर लॉरेन्स पोलिसांच्या हाती लागला नाही. अत्याचार करणारे तिघेही ज्ञान आश्रमातच मोठे झाले असून मोठे झाल्यावर त्यांना आश्रम इतर मुलांच्या देखभालीचे काम देण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीत १८ वर्षांच्या मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींवर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पीडित मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोपींनी मान्य केल्याचे कळते. या दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. आश्रमांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्र मोरे करत आहेत. यासंदर्भात माहिती देण्यास कळंबोली पोलीस टाळाटाळ करत आहेत.

First Published on June 14, 2018 1:09 am

Web Title: ashram school molestation case