पनवेल महापालिकेचा उपक्रम

पनवेल : पनवेलमधील नागरिकांना करोना विषाणूचा संशय असल्यास घरबसल्या नमुणे घेण्याची व्यवस्था पनवेल पालिकेने केल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे. पालिकेने यासाठी नवी मुंबई ठाणे येथील दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळांचे सहकार्य घेतले आहे.  या दोनही प्रयोगशाळांमधील कर्मचाऱ्यांचे पथक संबंधित नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचे नाव, पत्ता, करोना विषाणू तपासणीसाठीचे नमुणे घेणार आहेत.

सुमारे ९० टक्के पनवेलकरांनी स्वत:ला पूर्णपणे घरात कोंडून घेतले आहे. जीवनावश्यक वस्तू व वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडताना नागरिक दिसत आहेत.  रस्ते मोकळे झाले असले तरीकुटुंबातील सदस्याला सर्दी, डोकेदुखी, किरकोळ तापाची लक्षणे दिसल्यानंतर सर्व कुटुंब चिंतेत असते. त्यामुळे पालिकेने घरबसल्या आरोग्याविषयी चिंता वाढू नये आणि भितीने वैद्यकीय कारणासाठी नागरिक घराबाहेर पडू नयेत यासाठी ही व्यवस्था केली आहे.

पनवेल शहर, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू ठेवले आहे. नागरिक  या केंद्रांमधून सेवा घेऊ शकतील. मात्र अनेक नागरिकांनी तातडीने करोना विषाणूची तपासणी करायची आहे.

मात्र कस्तुरबा रुग्णालयातील अहवाल मिळविण्यासाठी विलंब लागत असल्याच्या तक्रारी होत असल्याने पालिकेने नवी मुंबई रबाळे येथील टी.टी.सी औद्योगिक वसाहतीमधील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर येथे तसेच ठाणे वागळे इस्टेट येथील इनफेक्शन लॅब्रोरट्रीज प्रा. लीमीटेड येथे या चाचण्या केल्या जाणार आहेत. चार हजार रुपये दर प्रती करोना चाचणीसाठी सरकारने ठरविला आहे.

यासाठी  ९७६९०१२०१२ व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधल्यास त्यांना पुढील सेवा मिळणार आहे.

संबंधित नागरिकांनी पालिकेला संपर्क साधल्यावर पालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी संबंधित नागरिकांची वैद्यकीय चौकशी केल्यानंतरच ही चाचणी केली जाणार आहे. यामध्ये संबंधित नागरिकाच्या अहवालाची प्रत पालिका व संबंधित व्यक्तीला देण्यात येणार आहे.

गणेश देशमुख, आयुक्त