नवी मुबई :  ऐरोली सेक्टर पाच येथील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएम मशीनला आग लागून लाखोंचे नुकसान झाले. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. मात्र वातानुकूलन यंत्रातील बिघाडामुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मंगळवारी रात्री साडेअकरा-बाराच्या सुमारास ऐरोली सेक्टर ५ येथील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. याबाबत माहिती मिळताच ऐरोली अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्वरित हालचाल केल्याने काही वेळातच आग विझवण्यात यश मिळाले. याच ठिकाणापासून काही अंतरावर पेट्रोल पंप असून त्यालाही आगीपासून धोका होता. मात्र अग्निशमन दलाने वेळीच हालचाल केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत काही स्पष्ट झाले नाही. मात्र वातानुकूलन यंत्रात बिघाड होऊन आग लागली असण्याची शक्यता अग्निशमन दलाने वर्तवली आहे. याच एटीएम मशीन कॅबीनमध्ये असलेले पासबुक एन्ट्री मशीनही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग एवढी मोठी होती की आतील वातानुकूलन यंत्र, अन्य सर्व वस्तू जळून खाक झाल्या.