राज्यात यंदा दुष्काळाचे सावट असल्याने नवी मुंबईतील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पाण्याचा अपव्यय न होण्याची काळजी घेतल्याचे दिसत आहे. याशिवाय सजावटीसाठी उभारण्यात आलेल्या देखाव्यांमधून जनजागृती करण्याचा अनेक मंडळांनी प्रयत्न केला आहे.
या आकर्षक देखाव्यांमधून धार्मिक, सांस्कृतिक विषयांसह पाणी बचत, अन्नाची नासाडी टाळणे आदी संदेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या देखाव्यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. सानपाडा येथील नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळ सोनखारचा राजा यांनी ‘जंगल वाचवा, प्राणी वाचवा’ हा संदेश दिला असून त्यासाठी आकर्षक देखावा तयार केला आहे. नेरुळ येथील भीमाशंकर गणेशोत्सव मंडळाने ‘भूक’ या विषयावर प्रबोधनात्मक देखावा साकरला आहे. एकीकडे अन्नाची होणारी नासाडी तर दुसऱ्या बाजूला दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्यांकडे लक्ष वेधून त्यांनी हा विरोधाभास मांडला आहे.
मुंबई व कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केटमधील अण्णासाहेब पाटील सांस्कृतिक मंडळाने आकर्षक मंदिर उभारले आहे. सीबीडी सेक्टर आठमधील शिवाई मित्रमंडळाने दुष्काळाच्या परिस्थितीचे चित्र देखाव्याच्या माध्यमातून रेखाटले आहे. या मंडळाच्या माध्यमातून दुष्काळासाठी निधी जमा करण्यात येत आहे. सेक्टर ८ परिसरातील सह्य़ाद्रीच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सवात पर्यावरणाचा संदेश देण्यात आला आहे. जुईनगरचा राजा मंडळानेही दुष्काळजन्य परिस्थितीवर सजावट केली आहे. जय महाराष्ट्र सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळ यांनी संत वचने उद्धृत करून नागरिकांना शांतपणे व प्रामाणिकपणे जगण्याचा मंत्र दिला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर १७ वाशी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वाशी व्यापारी संघ यांनी आकर्षक असे मंदिर साकारले आहे. दिघा रामनगर येथील शिवस्मृती मित्र मंडळ यांनी भाविकांना पाणीबचतीचा संदेश दिला आहे.