|| विकास महाडिक

पालिका-एमआयडीसीत जबाबदारीची टोलवाटोलवी

नवी मुंबई एमआयडीसीतील मुख्य रस्त्यांना केवळ सिमेंट क्राँक्रिटचा मुलामा चढवणाऱ्या पालिकने अंतर्गत रस्त्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून उद्योजक या सापत्न वागणुकीने हैराण झाले आहेत. एमआयडीसीने रबाळे, तुर्भे आणि महापे येथे २३५ कोटी रुपये खर्च करून काही रस्त्यांच्या पुनर्बाधणीला सुरुवात केली आहे, पण या कामातील गटारे, पदपथ आणि बाजूच्या डक्टच्या बांधणीचे काम सध्या सुरू आहे.

नवी मुंबई पालिकेने एमआयडीसीतील दिघा ते महापे व तुर्भे एमआयडीसीतील मुख्य रस्त्यांचे ४०० कोटी रुपये खर्च करून सिमेंट क्राँक्रिटीकरण केले आहे. त्यामुळे एमआयडीसीतील मुख्य रस्ते चकाचक दिसत असताना अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. हे अंतर्गत रस्ते एमआयडीसीने दुरुस्त करावेत असा पालिकेचा आग्रह आहे आणि पालिका विविध कर या भागातून जमा करीत असल्याने हे रस्ते पालिकेने दुरुस्त करावेत असे एमआयडीसीचे म्हणणे आहे.

उद्योजक गेली वीस वर्षे खड्डय़ांचा सामना करत आहेत. रबाळे एमआयडीसीतील आर ब्लॉकमधील आर-८०८ पासून ते ९१४ पर्यंतच्या कारखान्यांसमोर तळी निर्माण झाली आहेत. जवळच्या झोपडपट्टीतील सर्व सांडपाणी या कारखान्यांच्या दरवाजात साचते आणि उद्योजक आणि कामगार दरुगधीने बेजार होतात. या झोपडपट्टीवासीयांना याचा जाब विचारल्यास उद्योजकांना शिविगाळ केली जाते, तर काही ठिकाणी स्थानिक नगरसेवक उद्योजकांना धमकी देतात. नाले तुंबले आहेत. त्यामुळे एक तास पाऊस झाला, तरी रस्त्यावर चालणे मुश्कील होते. महापे येथील ए ब्लॉकमधील २३१ ते २६२ या कारखान्यांच्या समोरही पावसाळ्यात हीच स्थिती असते. त्यामुळे कच्चा माल आणणे आणि तयार उत्पादन बाहेर नेणे उद्योजकांसाठी आव्हान ठरत आहे.

एखाद्या कारखानदाराचा कारखाना पाहण्यास येणाऱ्या परदेशी शिष्टमंडळांनाही या तलावांतून आपली महागडी वाहने न्यावी लागतात. देशातील उद्योगांच्या दयनीय स्थितीचे दर्शन या परदेशी उद्योजकांना घडते. शिरवणे एमआयडीसीत डी ब्लॉकमध्ये अंतर्गत रस्त्याला एका नाल्याचे स्वरूप आले आहे. डोंगरातून या मार्गावर नदीसारखे पाणी वाहत आहे. तुर्भे एमआयडीसीतील डी ब्लॉकमध्ये हीच स्थिती आहे. पावणे एमआयडीसीतील डी ५३ या कंपनीच्या समोर आणि मागे सुविधांचे तीन तेरा वाजले आहेत. ऐन पावसाळ्यात या कारखान्याच्या दोन्ही प्रवेशद्वारांजवळ गुडघाभर पाण्याची तळी तयार होतात, तर मागे कचराभूमीच्या दरुगधीचा त्रास सहन करावा लागतो. याच भागात काही दिवसांपूर्वी ठाणे-बेलापूर मार्गावर अर्धा किलोमीटरचा एक उड्डाणपूल बांधण्यात आला. तेथून एमआयडीसीत जाताना बांधण्यात येणाऱ्या सिमेंट क्राँक्रिटच्या रस्त्यावर पावसाळ्यात धबधबे तयार होतात. पावसाळी पाण्याची गटारेच या मार्गात दिसेनाशी झालेली आहेत. त्यामुळे पावसाळी पाणी रस्त्यावर उतरत आहे.

एमआयडीसीतील पावसाळी नाल्यांची सफाई झालेली नाही. काही कारखानदारांनी पावसाचे पाणी कारखान्यात येऊ नये यासाठी कारखान्यसमोर चार ते पाच फुटांच्या उंच भिंती बांधल्या आहेत. थेट कारखान्यात येणारे पाणी या भिंतीमुळे येत नसले तरी ते दुसरा मार्ग तयार करून कारखान्याच्या जवळपास जमा होत आहे. सर्व कारखान्यांनी याबद्दल स्थानिक प्राधिकरणांकडे तक्रारी तर केल्या, पण त्यांची दखल अद्याप घेतली गेलेली नाही. या अंतर्गत रस्त्याच्या अडचणीमुळे अनेक कारखानदारांनी येथील भूखंड विकून दुसरीकडे बस्तान बसविले आहे. पालिकेने अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती किंवा पुनर्बाधणी करणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर एमआयडीसीने रबाळे येथे काही अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरुवात केली खरी पण या रस्त्याच्या उभारणीसाठी पूर्वतयारीतच त्यांचे पाहिले सहा महिने गेले आहेत. त्यामुळे या ठिकाणची स्थितीदेखील जैसे थे आहे.

बडय़ा कारखानदारांना आवश्यक असलेले मुख्य रस्ते पालिकेने तात्काळ तयार केले आहेत. लघू उद्योजकांना कारखान्यासमोरील खड्डे, दरुगधी, तळी आणि डासांचा उपद्रव कायम आहे. केंद्र आणि राज्य सरकार नवीन उद्योजकांसाठी अनेक कार्यक्रम राबविण्याच्या घोषणा करीत आहे, पण अस्तित्वात असलेला उद्योजक विविध समस्यांनी बेजार झाला आहे, त्याकडे मात्र कोणाचे लक्ष नाही   – किरण चुरी, माजी अध्यक्ष, स्मॉल स्केल एंटरप्रेनर्स असोसिएशन, नवी मुंबई</strong>