|| संतोष जाधव

पाऊस सुरू होताच शीव-पनवेल मार्गावर खड्डे; हस्तांतराअभावी पालिका दुरुस्तीस असमर्थ

वारंवार पडणाऱ्या खड्डय़ांमुळे डोकेदुखी ठरलेल्या शीव-पनवेल महामार्गावरील वाशी ते बेलापूर दरम्यानचा १४ किलोमीटरचा भाग नवी मुंबई पालिकेकचे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी लालफितीत अडकला आहे. त्यामुळे सध्या या महामार्गावर पडलेल्या खड्डय़ांना सार्वजनिक बांधकाम विभागाच जबाबदार असून त्यांनीच खड्डय़ांचे विघ्न दूर करावे, असा पवित्रा पालिकेने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना खड्डय़ांतून वाट काढतच मार्गक्रमण करावे लागत आहे.

गेल्या शनिवार ते सोमवारदरम्यान नवी मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसाने शीव-पनवेल मार्गाचे पितळ उघडे पडले आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडल्याने सोमवारी वाहतूककोंडी झाली होती. नवी मुंबईतून मुंबई-ठाण्याकडे जाणाऱ्या या महामार्गावरील खड्डय़ांमुळे नवी मुंबईत खड्डे असल्याची टीका वाहनचालक करत आहेत. मात्र हा मार्ग अद्यपही राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच आहे. त्यामुळे या रस्त्यावरील देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी राज्य शासनाची आहे, पालिकेची नाही.

वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी शासनाने २५ किमी लांबीच्या शीव – पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केले. त्यासाठी १२०० कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला. ६ जानेवारी २०१५ पासून खारघरमध्ये टोलवसुली सुरू करण्यात आली. परंतु लहान वाहनांना टोलमधून सूट दिल्याने नुकसान होत असल्याने ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतली. शासनाच्या व कंपनीच्या वादात प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. शिरवणे, नेरुळ, उरण फाटय़ाजवळील अर्धवट असलेले भुयारी मार्गाचे काम शासनाच्या परवानगीने पालिकेने पूर्ण केले आहे. पावसाळ्यात पडणाऱ्या खड्डय़ांबाबतही ठेकेदार व शासनाच्या भांडणात नागरिकांचे हाल होत आहेत. शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने पुन्हा या महामार्गाची चाळण झाली आहे. येथील पथदिवेही अनेकदा बंद असतात त्यामुळे वाहनचालकांना अंधारात चाचपडत वाहने चालवावी लागतात. अनेक अपघातही होतात. त्यामुळे या महामार्गावरील प्रवास डोकेदुखी ठरू लागला आहे.

१७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यान पालिकेने महामार्गालगतच्या जागेचे सुशोभीकरण केल्याने नवी मुंबई शहरातून जाणारा बेलापूर ते वाशीदरम्यानचा शीव-पनवेल महामार्गाचा भाग पालिकेकडे हस्तांतरित करून घेण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. मात्र त्याला राज्य सरकारने अद्याप मंजुरी दिलेली नाही. देखभाल-दुरुस्तीबाबत पालिकेला वारंवार शासनाकडे पाठपुरावा लागत आहे.

शीव-पनवेल महामार्गाच्या महापालिकेच्या हद्दीतील क्षेत्रात वाशी, सानपाडा, सानपाडा-दत्तमंदिर, नेरुळ, उरण फाटा व बेलापूर येथे सहा उड्डाणपूल आहेत. याशिवाय वाशी व शिरवणे येथे दोन छोटे उड्डाणपूल आहेत. या उड्डाणपुलांवरही कमी-अधिक प्रमाणात खड्डे  असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्डय़ांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना विचारणा केली असता संपर्क झाला नाही.

मार्ग हस्तांतरित झाल्यास वाशी ते बेलापूरदरम्यान रस्त्याची साफसफाई करणे शक्य होणार आहे. त्यामुळे धूलिकणांमुळे होणारे प्रदूषण थांबणार आहे. खड्डे बुजवणे, दिवाबत्ती ही कामे वेळीच होणे शक्य आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुशोभीकरण करणे शक्य होणार आहे.

बेलापूर ते वाशीपर्यंतच्या रस्त्यावर पावसाळ्यात नेहमीच खड्डे पडतात. त्यामुळेच पालिकेची विनाकारण बदनामी होते. म्हणूनच १४ किमीचा महामार्ग पालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे, परंतु अद्याप शासनाची मंजुरी मिळालेली नाही. या रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. याच महामार्गावरील भुयारी मार्गाची कामे पूर्ण केली आहेत. शासनाने हा महामार्ग आमच्याकडे हस्तांतरीत केल्यास शहारातील इतर रस्त्यांप्रमाणे या मार्गाचीही चांगली देखभाल करता येईल.   – मोहन डगावकर, अतिरिक्त आयुक्त, नमुंमपा