X

‘शीव-पनवेल’वर खड्डय़ांचे विघ्न

पालिका क्षेत्रातील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात

पालिका क्षेत्रातील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम गणरायाच्या आगमनापूर्वी पूर्ण केले जाईल, असा निर्धार पालिकेने केला आहे. मात्र असे असताना शीव-पनवेल महामार्गावरील खड्डय़ांचे विघ्न अद्याप कायम आहे. महामार्गावर सानपाडा ते तुर्भे या पट्टय़ात खड्डय़ांचे प्रमाण अधिक आहे. या ठिकाणी पडलेले खड्डे वारंवार भरण्यात आले आहेत. परंतु खड्डय़ांवरील ही तात्पुरती मलमपट्टी कुचकामी ठरली आहे. त्यामुळे गणेशाच्या मार्गातील खड्डय़ांचे विघ्न कायम आहे.

पालिकेने अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. बुधवापर्यंत अंतर्गत रस्त्यांवरही एकही खड्डा पाहायला मिळणार नसल्याचे पालिका आयुक्त एन. रामास्वामी यांनी सांगितले. दरवर्षी तुर्भे परिसर आणि उड्डाणपुलावरील खड्डय़ांमुळे पालिकेला टीकेला सामोरे जावे लागते. यंदाच्या वर्षी मुसळधार पावसात वाशी टोलनाका ते तुर्भे, याशिवाय बेलापूर, खारघर आणि कळंबोली परिसरातील खड्डय़ांमुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. शीव-पनवेल महामार्गावरील खड्डेदुरुस्ती कायमस्वरूपी ठरलेली नाही. बेलापूर ते दिघापर्यंत पालिकेच्या हद्दीत ठाणे-बेलापूर मार्गावर उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत. कोपरी गावातून जाणाऱ्या उड्डाणपुलावर वाशीकडील दिशेने खड्डे आहेत. त्याच प्रकारे कोपरखैरणे, घणसोली स्थानकाबाहेर ठाणे-बेलापूर मार्गावरील दोन्ही उड्डाणपुलावर खड्डे पडलेले आहेत.

ऐरोली उड्डाणपुलाखालून ऐरोली विभागात जाताना सिग्नल परिसरात खड्डे आहेत. त्यामुळे ठाणे बेलापूर मार्गावरही काही ठिकाणी  वाहतूक मंद झाली आहे. उरण फाटा ते पालिका मुख्यालयाकडे जाणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलावरही मोठे खड्डे पडले होते. सानपाडा उपनगरात जुईनगरवरून सानपाडा स्थानकाकडे जाताना सानपाडा टेलिफोन एक्स्चेंज कार्यालय, स्वामी विवेकानंद हायस्कूलसमोरील रस्ता तसेच सानपाडा पोलीस चौकीसमोर खड्डय़ांमुळे वाहतुकीत अडचणी निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून पालिकेने विविध ठिकाणी खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे.

मागील आठवडय़ात कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या शहरातील आगमानाआधी शीव-पनवेल महामार्गावरील वाशी गाव परिसरातील खड्डे बुजविण्यात आले. मात्र इतर ठिकाणी रस्त्यांची अवस्था दयनीयच आहे.

महामार्ग वगळता शहरात मोठय़ा प्रमाणात खड्डे नाहीत. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पडलेले खड्डे बुजविण्याचे आदेश अभियंता विभागाला दिले आहेत. बुधवारपर्यंत शहराअंतर्गत रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती उर्वरित काम पूर्ण करण्यात येईल.   -डॉ. एन. रामास्वामी. पालिका आयुक्त

First Published on: September 11, 2018 1:16 am