दुचाकीस्वरांचे अपघात वाढले; कारखानदारांनाही खराब रस्त्याचा फटका

तळोजा औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे २५ पेक्षा अधिक दुचाकीस्वरांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून बुधवारी सायंकाळीही एका तरुणीचा दुचाकीवरून जाताना अपघातात जागीच मृत्यू झाला. त्यामुळे या रस्त्यावर आणखी किती बळी जाणार, असा सवाल आता प्रवासी करीत आहेत. कारखानदारांनाही या खराब रस्त्याचा फटका बसत असून तेही नाराजी व्यक्त करीत आहेत.

पडघा रोड, नवीन पनवेल मार्गे वलप रोड, देवीचा पाडालगत वसाहतीतील मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. आमचा खड्डेमय प्रवास संपणार तरी कधी? असा सवाल परिसरातील नागरिक व कारखानदार करीत आहेत. या मार्गावर एक ते दोन फुटांचे खोल-खोल खड्डे पडले आहेत.

दरदिवशी या मार्गावर किरकोळ व गंभीर अपघात होत आहेत. त्यामुळे सिडको व एमआयडीसीने लवकरात लवकर डागडुजी करावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

वर्षभरापासून या रस्त्यांची अशीच भयावह अवस्था आहे. पावसाळ्यात हे खड्डे खोल खोल झाले असून आता सर्व खडी उखडून रस्त्यावर आली आहे. प्रचंड धुळीमुळे वाहनचालकांचा श्वास गुदमरत आहे. एमआयडीसी प्रशासनही याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.

औद्योगिक वसाहतीमध्ये ९५० हून अधिक कंपन्या आहेत. नियमित कर भरत असूनदेखील रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधा मिळत नसल्याबद्दल कारखानदार नाराजी व्यक्त करीत आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे वाहतूक कोंडीही नेहमीचीच झाली आहे. कारखानदारांनाही याच फटका बसत आहे.

या संदर्भात एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंता आर. पी. पाटील यांना विचरणा केली असता, ज्या रस्त्यावर खड्डे आहेत, त्या रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. येत्या दोन महिन्यांत रस्त्यांची कामे पूर्ण होतील, असे सांगितले.

अपघातात तरुणी जागीच ठार

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघात वाढले असून बुधवारी रात्री आठच्या सुमारास दुचाकीला ट्रकने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात विवाहितेचा जागीच मृत्यू झाला.

तेजल किरण चव्हाण (२८, रा. दारावे) असे अपघातात ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे. ती तळोजा औद्योगिक वसाहतीत काम करीत असून कामावरून आपल्या दुचाकीवरून घरी जात होती. ट्रकने मागून धडक दिली व तिच्या अंगावरून चाक गेले. अतिरक्तस्राव व मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे तेजल हिचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालकाने पळ काढला असून ट्रक तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

तळोजा एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. मात्र अंतर्गत रस्त्यांचे खड्डे तसेच आहेत. अपघात झाल्यामुळे रस्ता ठप्प होतो. माल ने-आण करण्यासाठी उशीर होत असून त्याचा फटका बसत आहे.    संदीप डोंगरे, अध्यक्ष, तळोजा वस्तुनिर्माण

रस्त्यांचे खड्डे वाढले आहेत. या खड्डय़ांमुळे २५ पेक्षा अधिक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. कित्येक गरोदर महिलांनाही त्रास झाला आहे. त्यामुळे हे खड्डे त्वरित बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा ग्रामस्थांमार्फत आंदोलन छेडण्यात येईल.    सूरज गायकर (रहिवासी)