नवी मुंबई : खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा आणि नवीन पनवेल परिसरात सुरू असलेल्या वाढत्या बांधकामांमुळे महामुंबई क्षेत्रात बांगलादेशी घुसखोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात हे प्रमाण ४५० पर्यंत गेल्याचे स्पष्ट झाले आहे. जानेवारी २०१२ मध्ये हेच प्रमाण केवळ २०२ एवढे होते. नवी मुंबईत कामानिमित्ताने आलेल्या ५० अफ्रिकन नागरिकांनी त्यांच्या वास्तव्याची माहिती पोलीस आयुक्तालयाला दिली आहे, पण एकाही बांगलादेशी नागरिकाने पोलिसांकडे अधिकृत नोंद केलेली नाही.

मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महामुंबई क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात बांधकामे सुरू असून बांधकाम मजूर म्हणून मोठय़ा प्रमाणात बांगलादेशी नागरिक आहेत. हे कामगार कमी वेळात पूर्णवेळ उपलब्ध होत असल्याने बांधकाम कंत्राटदार हे मजूर पश्चिम बंगालमधून मोठय़ा प्रमाणात आणत असल्याचे कळते. सुरक्षारक्षक, घरकामगार महिला, बारमध्ये काम करण्यास महिलांमध्ये बांगलादेशींचे प्रमाण जास्त आहे.

गतवर्षी कोपरखैरणे सेक्टर १९ मधून नऊ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती. सर्व प्रक्रिया करून त्यांना पुन्हा त्यांच्या देशात पाठविण्यात आले, पण हे नागरिक पुन्हा देशात येत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई पोलीस दलातील काही अधिकारी दोन वर्षांपूर्वी खारघर येथे बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यास गेले असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली होती. त्यात दोन अधिकारी जबर जखमी झाले होते. दिघा, रबाळे, तुर्भे स्टोअर, शिरवणे, घणसोली या भागांत घुसखोर बांगलादेशी नागरिकांची संख्या जास्त आहे. स्थानिक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. त्यामुळे हे प्रमाण वाढले आहे. बांगलादेशी नागरिकांना पॅन कार्ड व आधार कार्ड बनवून देणारे काही दलाल असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आधारकार्ड असल्याने या नागरिकांकडे निवासाचा दाखला सहज मिळतो. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात अडचण येत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.